Join us

 प्रियंका चोप्राला युनिसेफच्या गुडविल अ‍ॅम्बेसेडर पदावरून हटवा! पाकिस्तानींनी छेडली ऑनलाईन मोहिम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 12:57 IST

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाई कारवाईनंतर हवाई दलाचे कौतुक करणारी प्रियंका चोप्रा पाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये युनिसेफने प्रियंकाची ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावर नियुक्ती केली होती.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाई कारवाईनंतर हवाई दलाचे कौतुक करणारी प्रियंका चोप्रापाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. पाकिस्तानी युजर्सनी प्रियंकाला लक्ष्य करत एक  ऑनलाईन मोहिम छेडली आहे. प्रियंकाला युनिसेफच्या ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावरून हटवा, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. २०१६ मध्ये युनिसेफने प्रियंकाची ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावर नियुक्ती केली होती.दरम्यान, गत १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर  भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या  लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुज्झफराबादमधील  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.  या कारवाईनंतर भारतीय हवाई दलाचे कौतुक करणारे   ट्विट  प्रियंकाने केले होते. ‘Jai Hind ’, असे तिने या ट्विटमध्ये लिहिले होते.

पाकिस्तानी युजर्सनी तिच्या या ट्विटचा विरोध चालवला आहे. युनिसेफची सदिच्छादूत या नात्याने प्रियंकाने शांततेला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तिने असे न करता,भारतीय हवाई दलास युद्धासाठी प्रोत्साहित केले, असे पाकिस्तानी युजर्सचे म्हणणे आहे.

प्रियंकाचे भारतीय हवाई दलास चीअर करणारे ट्विट रिट्विट करत, पाकिस्तानी अभिनेत्री अरमीना खान हिने पीसीवर टीका केली आहे. ‘तुला युनिसेफची सदिच्छादूत मानायचे नाही का? सर्वांनी प्रियंकाच्या या टिष्ट्वटचे स्क्रीनशॉट्स घ्या आणि यानंतर ती कधी शांती व सद्भावनेबद्दल बोललीच तर तिचा दुटप्पीपणा उघडा पाडा,’ असे अरमीना खानने लिहिले आहे.

अरमीना खानच्या या टिष्ट्वटनंतर अनेक पाकिस्तानी युजर्सनी युनिसेफ व संयुक्त राष्ट्र संघाला टॅग करत, प्रियंकाला युनिसेफच्या सदिच्छादूत पदावरून हटविण्याची मागणी करत मोहिम छेडली आहे. तूर्तास प्रियंकाने या मुद्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :प्रियंका चोप्रापाकिस्तानएअर सर्जिकल स्ट्राईक