काश्मिरमधील पहलगाम या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. २६ पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेने देश हादरला. यानंतर आता काश्मिरला जाण्याची कोणा पर्यटकाची हिंमतही होणार नाही असंच चित्र निर्माण झालं. तर दुसरीकडे अभिनेता अतुल कुलकर्णी हल्ल्यानंतर काहीच दिवसात काश्मिरला पर्यटनाला गेला. हल्ल्याची निंदाच पण आपल्या काश्मिरचं पर्यटन थांबवू देऊ नका असं त्याने सर्वांना आवाहन केलं. तर दुसरीकडे 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची निर्मिती अभिनेत्री पल्लवी जोशीने (Pallavi Joshi) केलेलं भाष्य आता चर्चेत आहे.
अभिनेत्री पल्लवी जोशीने काश्मिरला जाऊ नका असंच आवाहन केलं आहे. 'न्यूज १८ लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "काश्मिरला पर्यटनासाठी आता कोण जाणार? जे लोक आवाहन करत आहेत त्यांनी खुशाल तिथे पर्यटनासाठी जावं. पण मी आत्ता कोणालाच काश्मिरला जाण्याचं आवाहन करणार नाही. 'जा ओ...तिकडे सगळं व्यवस्थित आहे' असं मी म्हणू शकणार नाही. कारण मला तिथली परिस्थिती माहित आहे. मी कशाला कोणाला तिकडे जायला सांगेन आणि त्यांचा जीव धोक्यात घालेन. भारतात इतर पर्यटनस्थळ नाहीयेत का?"
जे सेलिब्रिटी जात आहे ते...
ती पुढे म्हणाली, "ज्या टूर्स सध्या काश्मिरला नेण्यात येत आहेत, जे सेलिब्रिटी काश्मिरला जात आहेत त्यांच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था आहे. जे राजकीय पक्षाचे नेते तिकडे जात आहेत ते वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा घेऊन जात आहेत. सामान्य पर्यटक सुरक्षा घेऊन जातो का? त्यांच्यासाठी कोणती सुरक्षाव्यवस्था असणार? आज जर मी ठरवलं की जून महिन्यात सुट्टीसाठी कुठेतरी जाऊ आणि मला कोणी म्हणालं की काश्मिरला जाऊया. तर मी म्हणेन, वेडा आहेस का?"
पल्लवीने मुलाखतीत काश्मीर फाईल्सच्या चित्रीकरणावेळी आलेले अनेक अनुभवही सांगितले. तसंच हा दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आता मजबूत पावलं उचलली गेली पाहिजेच असंही तिने या मुलाखतीत मत व्यक्त केलं.