Saba Qamar Viral Video: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. पण, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतावर टीका केली. यानंतर अनेक भारतीय खवळले. भारतावर टीका केल्याने 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) सिनेमात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटात दिसलेली माहिरा खान यांचे फोटो चित्रपटाच्या काढून टाकण्यात आले आहेत. पण, यातच बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्यामध्ये अभिनेत्री सबा कमरनं पाकिस्तानी नागरिक असल्यानं तिला कसा अपमान सहन करावा लागला होता, याबद्दल सांगितलं.
सबा कमरचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सबा कमरने पाकिस्तानचा पासपोर्ट असल्यानं तिच्यावर परदेशात कसा संशय घेतला गेला, हे सांगितलं. यावेळी ती भावूक झाल्याचं पाहायला मिळाली. व्हिडीओमध्ये सबा म्हणते, "पाकिस्तानसाठी आपण 'झिंदाबाद'चे नारे देतो, पण बाहेरच्या देशांमध्ये आपल्या देशाबद्दलची प्रतिमा काय आहे हे पाहून मन खिन्न होतं. मी त्बिलिसीला शूटिंगसाठी गेले होते. सर्व भारतीय टीम पासपोर्ट तपासणी करून पुढे गेली, पण मला थांबवण्यात आलं. कारण मी पाकिस्तानी होते. माझी तपासणी झाली, मुलाखत झाली. त्या दिवशी मला अपमानित वाटलं. तेव्हा जाणवलं की, आपली जगात काय प्रतिष्ठा आहे आणि आपण कुठे उभे आहोत".