मल्याळम सिनेमाचे ज्येष्ठ अभिनेते पी. बालचंद्रन यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. सोमवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बालाचंद्रन केवळ अभिनेताच नव्हते, तर उत्तम पटकथा लेखकही होते. अंकल बन, पुलिस, कल्लू कोनडोरू पेन्नू या चित्रपटासाठी त्यांनीच कथा लिहिल्या होत्या. हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार वन चित्रपटात शेवटचे झळकले होत.
बालाचंद्रन यांच्या मागे पत्नी श्रीलता आणि दोन मुले श्रीकांत आणि पार्वती आहेत. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि निर्माता जयसूर्याने आपल्या सोशल मीडियावर बालचंद्रन यांचे फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनय आणि पटकथा लेखनाव्यतिरिक्त दिग्दर्शनातही त्याने हात आजमावला. २०१२ मध्ये त्यांनी कवी पी.कुनिरामन नायर यांच्या जीवनावर आधारित इवान मेघरूपन चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मात्र, या चित्रपटाच्या नंतर त्यांनी कोणत्याच अन्य चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही.
बाळचंद्रन हे नाटककारही होते. त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांच्या पावम उस्मान या नाटकाची प्रचंड चर्चा झाली होती. या नाटकासाठी त्यांना १९८९ मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ व्यावसायिक नाटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.