प्रियंका चोपडाबरोबर काम करण्यासाठी अक्षयकुमार शोधतोय संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:17 IST
एकेकाळचे बेस्ट फ्रेंड व त्यापेक्षाही जवळचे नाते असलेले अक्षयकुमार अन् प्रियंका चोपडा गेल्या दहा वर्षांपासून एकत्र आले नाहीत. सुरुवातीच्या ...
प्रियंका चोपडाबरोबर काम करण्यासाठी अक्षयकुमार शोधतोय संधी
एकेकाळचे बेस्ट फ्रेंड व त्यापेक्षाही जवळचे नाते असलेले अक्षयकुमार अन् प्रियंका चोपडा गेल्या दहा वर्षांपासून एकत्र आले नाहीत. सुरुवातीच्या काळात तब्बल पाच सिनेमे एकत्र केल्यानंतर त्यांच्यातील नात्यांवरून उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांमुळे हे दोघे पुढच्या काळात एकत्र येऊ शकले नाहीत. मात्र दोघांमधील हा दुरावा आता अक्षयला असह्य होत असून, तो प्रियंकासोबत काम करण्याची संधी शोधत आहे. याबाबतचा खुलासा खुद्द अक्षयकुमार यानेच केला आहे. सध्या अक्षय त्याच्या ‘जॉली एलएलबी-२’च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्याबरोबर विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. जेव्हा तो टीव्ही शो आपकी अदालतमध्ये पोहचला तेव्हा त्याने प्रियंका चोपडाविषयी विचारलेल्या प्रश्नांचे दिलखुलास उत्तरे दिलीत. अक्षयने म्हटले की, प्रियंकासोबत काम करायचे नाही असा मी कधीच विचार केला नाही. प्रियंकाबरोबर मी पाच सिनेमांमध्ये काम केले आहे. आमची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही भावली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तर संधी शोधत आहे. आतापर्यंत मी राणी मुखर्जी हिला सोडता सर्वच अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. त्यामुळे जर मला भविष्यात तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यास मी लगेचच त्यास होकार देईल. प्रियंका चोपडा आणि अक्षयकुमार यांनी ‘अंदाज, मुझसे शादी करोगी, एतराज’ आदि सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र या सिनेमांमुळे त्यांच्यात जवळिकता वाढली असून, दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. यामुळे अक्षयची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना हीदेखील प्रियंकाचा तिरस्कार करीत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मात्र ही जोडी पुन्हा स्क्रिनवर बघावयास मिळाली नाही. आता मात्र अक्षय पुन्हा प्रियंकासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. मात्र भलेही अक्षयला प्रियंकासोबत काम करायचे असले तरी, प्रियंकाला त्याच्यासोबत काम करण्यात पुरेसा वेळ आहे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कारण सध्या प्रियंका अमेरिका टीव्ही सिरिज ‘क्वाटिंको’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर लवकरच तिचा ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटही रिलिज होणार आहे. त्यामुळे ती अक्षयसोबत कधी काम करू शकणार हे बघणे मात्र औत्सुक्याचे ठरेल. मात्र अक्षय प्रियंकासोबत काम करण्यास जबरदस्त उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने प्रियंकाला पीपल्स चॉइस अवॉर्ड मिळाल्यानंतर, ती या अवॉर्डसाठी योग्य असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर तिने अशाच प्रकारे काम करून स्वत:ला सिद्ध करावे, आम्हाला तिचा गर्व वाटतो, अशा शब्दात तिच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. मात्र प्रियंकाने अक्षयच्या या कौतुकाला कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नव्हते. प्रियंका आणि अक्षयचा अखेरचा ‘वक्त’ हा सिनेमा २००५ मध्ये रिलिज झाला होता.