ओम पुरी यांच्या मृत्यूमागे मोदींचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:08 IST
बॉलिवूडचे अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूबद्दल संशयाचे धुके निर्माण झाले असतानाच एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या अँकरने एक खळबळजनक आरोप ...
ओम पुरी यांच्या मृत्यूमागे मोदींचा हात?
बॉलिवूडचे अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूबद्दल संशयाचे धुके निर्माण झाले असतानाच एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या अँकरने एक खळबळजनक आरोप केला आहे. होय, ओम पुरी यांच्या मृत्यूमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा हात असल्याचा आरोप या अँकरने केला आहे. अर्थात पाकिस्तानी अँकरच्या या आरोपाची सोशल मीडियात जोरदार खिल्ली उडवली जात आहे.भारतातील उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ओम पुरी यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ विधान केले होते. यामुळेच मोदी व डोवाल यांनी ओम पुरीच्या हत्येचा कट रचला, असा आरोप ‘बोल ’या पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या या अँकरने केला आहे. अलीकडे ओम पुरी यांना डोवाल यांनी त्यांच्या घरी बोलवले होते. यावेळी ओम पुरींना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली, असा दावाही या अँकरने केला आहे. याचवेळी उरी हल्ल्यातील शहीदांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याचे आदेश ओम पुरींना देण्यात आले होते, असेही या अँकरने म्हटले आहे.गत ६ जानेवारीला ओम पुरी त्यांच्या घरी निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यानंतर चित्रपट निर्माते खालिद किदवई यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. मृत्यूच्या एक दिवस आधी ओम पुरी प्रचंड तणावात होते. ते आपल्या मुलाला भेटू इच्छित होते. मात्र ही भेट होऊ शकली नाही, असा दावा किदवई यांनी केला होता. ओम पुरी यांच्या मृत्यूबद्दल असा संशय निर्माण झाला असतानाच त्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.