Join us  

नो डिनर, नो शूटिंग; विद्या बालनला वनमंत्र्यांशी घेतलेला पंगा पडला महागात, थांबवली शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 6:38 PM

विद्याच्या 'शेरनी'चे शूटिंग काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये सुरू होते. त्यादरम्यान तिची आणि मध्य प्रदेशच्या वनमंत्र्यांची भेट झाली होती.

अभिनेत्री विद्या बालन लवकरच शेरनी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये तिच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यादरम्यान विद्या बालन आणि मध्य प्रदेशच्या वनमंत्री विजय शाह यांची भेट झाली. त्यावेळी विजय शाह यांनी तिला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले पण तिला कामामुळे ते शक्य नसल्याने तिने नकार दिला. त्यानंतर विद्याच्या शूटिंगदरम्यान अडथळा आल्याचे म्हटले जात आहे.

बालाघाटमध्ये विद्याच्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू होते. शूटिंगसाठी २० ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान रितसर परवानगी मिळाली होती. त्यादरम्यान मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटीसाठी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. यानंतर, वनमंत्री सायंकाळी चार वाजता महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाणार होते. तिथे त्यांना रात्रीचा मुक्काम करायचा होता, मात्र तो भरवेली खाणीच्या विश्रामगृहात वनमंत्री थांबले.

अखेर विद्या आणि वनमंत्र्यांची भेट संध्याकाळी ५ वाजता झाली. त्यांनी विद्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिले. पण विद्या त्यावेळी महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने तिने नकार दिला. याचा परिणाम विद्याच्या शूटिंगवर झाला असा आरोप करण्यात येतो आहे. दुसर्‍या दिवशी जेव्हा चित्रपटाचं यूनिट नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या गाड्या रोखण्यात आल्या. त्यांना शूटिंगची परवानगी नाकारण्यात आली. अखेर मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) नरेंद्र कुमार सनोदिया यांच्या आवाहनानंतर शूटिंगला सुरुवात झाली.

चित्रपटाच्या शूटिंगला अडवणूक केल्याच्या प्रकाराबद्दल मध्य प्रदेशच्या वनमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, त्या दिवशी शूटिंगसाठी जंगलामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जनरेटर नेण्यात आले होते. म्हणून शूटिंगला परवानगी नाकारली होती. त्यामध्ये इतर कोणताही हेतू नव्हता.

टॅग्स :विद्या बालन