Join us

'निशांची' हा सलीम-जावेद यांच्या सिनेमांची आठवण करुन देणारा हटके सिनेमा, अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:03 IST

'निशांची' सिनेमाबद्दल अनुराग कश्यपने केलेलं विधान चर्चेत आहे

अ‍ॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया निर्मित 'निशांची' हा २०२५ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरतोय. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर' सारखा आयकॉनिक क्राइम ड्रामा देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप 'निशांची'मधून पुन्हा एकदा त्यांच्या खास स्टोरीटेलिंग स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे हा सिनेमा एक प्रचंड प्रभावी क्राइम ड्रामा ठरणार हे निश्चित मानलं जात आहे.

अलीकडील एका मुलाखतीत, जेव्हा अनुराग कश्यप यांना विचारण्यात आलं की, गँग्स ऑफ वासेपुरने सलीम-जावेद यांच्या 70-80 च्या दशकातील सिनेमाची झलक कशी दाखवली, आणि त्यांनी आजवर पूर्णपणे कमर्शियल फिल्म का बनवली नाही,  यावर त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं. कश्यप म्हणाले, "हीच ती फिल्म आहे. मी 'निशांची'माझी 'फुल-ऑन सलीम-जावेद झोन'मधली फिल्म म्हणतो, कारण यात सगळं काही आहे. तसाच हिरो, तसाच ड्रामा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक परिणामकारक कथा. या चित्रपटात प्रेक्षकांच्या सर्व गरजा पूर्ण होणार आहेत."

गँग्स ऑफ वासेपुर आणि निशांची यामध्ये काय फरक आहे, हे सांगताना अनुराग यांनी स्पष्ट केलं की, "वासेपुर आणि 'निशांची'या दोन पूर्णपणे भिन्न दुनियेतल्या फिल्म्स आहेत. 'निशांची' ही माझ्या आतून आलेली गोष्ट आहे. ती अधिक वैयक्तिक आहे." नुकताच रिलीज झालेला 'निशांची'चा टीझरही एक जबरदस्त क्राईम ड्रामा असणार याचं आश्वासन प्रेक्षकांना देतो. या चित्रपटात थ्रिल, अ‍ॅक्शन, रोमान्स आणि हाई-वोल्टेज ड्रामाचा संपूर्ण मसाला असणार आहे. या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत, तेही डबल रोलमध्ये. त्याची जोडी वेदिका पिंटोसोबत जुळवण्यात आली आहे.

चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं आहे, तर निर्मिती अजय राय आणि रंजन सिंह यांनी जार पिक्चर्स व फ्लिप फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी एकत्र लिहिलेली आहे. ही कथा दोन भावांभोवती फिरते, जे वेगवेगळ्या वाटा निवडतात आणि त्यांच्या निवडीच त्यांच्या भवितव्यावर ठसा उमटवतात. चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे, वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. 'निशांची' संपूर्ण भारतात १९ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अनुराग कश्यप