Join us

नागराज मंजुळेने महानायकांबाबत सांगितल्या लहानपणीच्या मजेशीर आठवणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 20:33 IST

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेला मराठी दिग्दर्शक तथा निर्माता नागराज मंजुळे लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करणार आहे. ...

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेला मराठी दिग्दर्शक तथा निर्माता नागराज मंजुळे लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करणार आहे. आपल्या पहिल्या बॉलिवूडपटासाठी नागराजने अमिताभ यांना कास्ट केले असून, हा चित्रपट निवृत्त शिक्षक विजय बर्से यांच्या जीवनावर आधारित असेल. सध्या नागराज या चित्रपटावर काम करीत असून, तो याविषयी खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहे. नागराजने नुकतेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केला असून, त्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्याविषयीच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. आपला आनंद व्यक्त करताना नागराजने हिंदीमध्ये काही ओळी लिहिल्या आहेत. ‘जब दीवार फिल्म देखी तब शर्ट को गॉँठ मारकर स्कूल जाता था’ अशा वाक्याने त्याने आपल्या पोस्टला सुरुवात केली. पुढे नागराजने लिहिले की, ‘शर्टला बांधलेल्या गाठीमुळे रोज शिक्षकांचा मार खात होतो, तरीदेखील गाठ बांधलेली असायची. मित्राच्या माती वाहणाºया गाढवांना चोरून नेत ‘शोले’चा खेळ खेळत होतो. पण ज्याचे गाढव असायचे तोच अमिताभ बनत असे. या खेळात मी सांभा बनूनसुद्धा आनंदी राहायचो. मात्र या खेळाचे दिग्दर्शन माझे असायचे’ असेही नागराजने सांगितले. ">पुढे नागराजने लिहिले की, ‘याराना’ बघितल्यानंतर ‘कच्चा-पापड पक्का-पापड म्हणून गल्लीतील लोकांना त्रास देत होतो. डॉन, कुली, सत्ते पे सत्ता, शहेनशा, लावारिस, कालिया, शराबी अशी कित्येक चित्रपटांच्या कथा सांगून मित्रांचे मनोरंजन करीत असायचो. लहानपणापासून जो माझा सर्वात आवडता अभिनेता आहे, ज्याचे चित्रपट बघून मी मोठा झालो. त्या आजच्या काळातील महानायक आज माझ्या हिंदी चित्रपटाचा नायक आहे. यापेक्षा आनंदाची बाब माझ्यासाठी दुसरी काही असूच शकत नाही.’ अशा शब्दात नागराजने त्याचा आनंद व्यक्त केला. ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करून मराठी इंडस्ट्रीत इतिहास लिहिणारा नागराज आता हिंदीमध्ये असाच इतिहास रचन्यास सज्ज झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन नागराज चित्रपटाची निर्मिती करीत असून, त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता लागली आहे.