Join us

नागराज मंजुळेने ‘सैराट’साठी करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 17:34 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर लवकरच दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘सैराट’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर लवकरच दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘सैराट’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. त्यामुळे करण जोहरने मराठी ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडे मदत मागितली होती. करणच्या मते, नागराजने त्याला ‘सैराट’चा रिमेक बनविण्यासाठी मदत करावी, परंतु नागराजने करणला मदत करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याची बातमी समोर येत आहे. डीएनए रिपोर्टनुसार, दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या अमिताभ बच्चनसोबत त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र करणला मदत न करण्याचे त्याचे हेच एकमेव कारण नाही, तर करण जोहरचा उतावीळपणा नागराजला फारसा भावलेला दिसत नाही. करण सध्या ‘सैराट’च्या रिमेकमुळे खूपच उत्साहित आहे. त्याला चित्रपटाच्या मूळ कथेत काही नवीन एक्सपेरिमेंण्ट्स करायचे आहेत. त्याचबरोबर तो जान्हवीला एका गावातील मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणू इच्छितो, हीच बाब नागराजला खटकत आहे. त्यामुळे त्याने करणला मदत न देण्याबरोबरच या प्रोजेक्टपासून चार हात लांब राहण्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रानुसार श्रीदेवीची मुलगी असलेल्या जान्हवीला लॉन्च करण्यासाठीच करण हा सर्व खटाटोप करीत आहे. वास्तविक तिचा लूक गावातील मुलीप्रमाणे अजिबातच वाटत नाही. शिवाय ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे, हेही प्रेक्षक चांगल्या प्रकारे जाणून आहेत. त्यामुळे केवळ तिला लॉन्च करण्यासाठीच जर तिला ‘सैराट’मध्ये संधी दिली जात असेल तर ते फारसे पटणारे नाही. त्याचबरोबर चित्रपटातील अभिनेताही गरीब दाखविण्यात येणार आहे. मात्र त्याची मस्क्युलर बॉडी बघून तो कुठल्याच अ‍ॅँगलने गरीब दिसत नाही. अशात हे दोन्ही पात्र कथेच्या विपरीत असल्याने नागराज या प्रोजेक्टपासून दूर राहत आहे. मराठी ‘सैराट’मध्ये नागराजने सर्वसामान्य मुलांना मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर सादर करीत त्यांना रातोरात सुपरस्टार केले. सैराटने बॉक्स आॅफिसवर शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. निर्माता करण जोहर हादेखील असाच प्रयत्न करू इच्छित आहे. परंतु नागराज मंजुळेला त्याचा हा प्रयत्न फारसा पसंत आलेला दिसत नाही.