न्योनिता लोढ दिसणार माझी मुलगी या लघुपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:47 IST
मिस इंडिया न्योनिता लोढ ही आता अभिनयाकडे वळली आहे. न्योनिता लोढ ही तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत ...
न्योनिता लोढ दिसणार माझी मुलगी या लघुपटात
मिस इंडिया न्योनिता लोढ ही आता अभिनयाकडे वळली आहे. न्योनिता लोढ ही तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते. आता ती माझी मुलगी या लघुपटात झळकणार आहे. या लघुपटासाठी तिने चित्रीकरण देखील केले आहे.सचिन गुप्ताने पराठे वाली गली, थोडा लुफ्त थोडा इश्क यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचे चित्रपट हे आशयपूर्ण विषय आणि लक्षवेधी कल्पनांसाठी मनोरंजन जगतात ओळखले जातात. आता तो एक लघुपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. एक सामाजिक संदेश देणारा माझी मुलगी असा त्याचा आगामी लघुपट असून याचे लेखन सचिन गुप्तानेच केले आहे. तसेच दिग्दर्शन देखील त्याचेच आहे. या लघुपटामध्ये पुरुषी अहंकाराला पिता-मुलगी नात्यावर आधारित उत्तरं देण्यात आली आहेत. स्त्रियांच्या दडपल्या जाणाऱ्या भावनांना या लघुपटाद्वारे मांडण्यात आले आहे. पुरुषसत्ताक वृत्ती आजदेखील आपल्या समाजात पाहायला मिळते. स्त्री-पुरुष समानता होऊ नये यासाठी ही वृत्ती अडथळा निर्माण करताना दिसत आहे. वर्तमानपत्रात आपल्याला रोजच स्त्रियांच्या विरोधात असलेल्या बातम्या पाहायला मिळतात. त्यामुळे या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी या घटना मानसिक दृष्टिकोनातून समजावून घेण्याची गरज आहे. न्योनिता लोढसोबत या लघुपटात सुनील हांडा देखील झळकणार आहे. सुनील हांडाने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सचिन गुप्ताची चिलसाग एन्टरटेन्मेंट नेटवर्क या लघुपटाची निर्मिती करत आहे. या निर्मिती संस्थेने आतापर्यंत अनेक नाटकं, चित्रपट, लघुपट आणि वेबसिरिजची निर्मिती केली आहे.