Join us

राहुल देवचा सख्खा भाऊ होता मुकुल देव, भावाच्या निधनानंतर अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:33 IST

मुकुल देवच्या पश्चात एक मुलगी आहे जिचं नाव सिया आहे.

'सन ऑफ सरदार', 'जय हो' यांसारख्या सिनेमांमध्ये दिसलेला अभिनेता मुकुल देवचं (Mukul Dev) निधन झाल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मुकुल देव दिल्लीत वास्तव्यास होता. काही दिवसांपासून तो आजारी होता आणि रुग्णालयात दाखल होता अशीही माहिती नंतर समोर आली. अभिनेता राहुल देव (Rahul dev) हा त्याचा सख्खा भाऊ आहे. राहुलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

राहुल देवने इन्स्टाग्रामवर मुकुल देवचा फोटो शेअर करत लिहिले, "आमचा भाऊ मुकुल देवचं काल रात्री नवी दिल्ली येथे निधन झालं. त्याच्या पश्चात लेक सिया देव आहे. भाऊ राहुल देव, बहीण रश्मी कौशल आणि भाचा सिद्धांत देव यांच्यात तो कायम स्मरणात राहील. मुकुलच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता दयानंद मुक्ती धाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत."

मुकुल देवने १९९६ सालीच अभिनयाला सुरुवात केली.  अनेक टीव्ही मालिकांमध्येही झळकला. 'घरवाली उपरवाली', 'शsssफिर कोई है', 'कशिश', 'कुमकुम' या मालिकांमध्ये त्याने काम केलं. 'सन ऑफ सरदार' सिनेमातील भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. याशिवाय त्याने 'जय हो','आर राजकुमार','यमला पगला दीवाना' सिनेमांमध्येही काम केलं. इतकंच नाही तर तो वैमानिकही होता. त्याने रायबरेलीतील इंदिरा गांधी एव्हिएशन इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतलं होतं. 'सन ऑफ सरदार २' मध्येही तो दिसणार होता. 

टॅग्स :राहुल देवमृत्यूसेलिब्रिटी