Join us  

A Thursday Movie Review: काळजाला भिडणारा 'अ थर्स डे'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यामी गौतम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:14 PM

A thursday Movie Review: 'अ थर्स डे' या चित्रपटात यामीसह डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.

कलाकार:  यामी गौतम, अतुल कुलकर्णी, नेहा धुपिया, डिंपल कपाडिया

दिग्दर्शक: बहजाद खंबाटा

रेटिंग: 3.5

A thursday Movie Review : प्रत्येक चित्रपटाची एक कथा असते आणि या कथेमधून दिग्दर्शक एक मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत कलाविश्वात अनेक नवनवीन धाटणीच्या, कथानकांच्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यामध्येच सध्या अभिनेत्री यामी गौतम हिचा अ थर्स डे (A Thursday) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाने कथेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या नजरा शेवटपर्यंत खिळवून ठेवल्या होत्या. त्यामुळे सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर तुफान चर्चिला जात आहे.

'अ थर्स डे' या चित्रपटात यामीसह डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

अ थर्स डे या चित्रपटाची संपूर्ण कथा नैना जायसवाल( यामी गौतम) हिच्या भोवती फिरताना दिसते. नैना एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असते. याच शाळेतील १६ मुलांचं ती अपहरण करते आणि याची माहिती ती स्वत:चं पोलिसांना देते. इतकंच नाही तर, तिच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर या मुलांच्या जीवाचं बरं वाईट करेन अशी धमकीही ती देते. यामध्ये नैना पाच कोटी रुपये तिच्या खात्यात जमा करण्यास सांगते. तसंच पंतप्रधान माया राजगुरु( डिंपल कपाडिया) आणि पोलिस ऑफिसर जावेद खान( अतुल कुलकर्णी) यांच्याशी समोरासमोर बसून बोलण्याची मागणी करते. मात्र, नैनाचं पोलिस अधिकारी आणि पंतप्रधानांसोबत बोलणं होतं की नाही, ती मुलांना सोडते की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल. 

चित्रपटाची मांडणी

या चित्रपटाची मांडणी अत्यंत रंजक पद्धतीने करण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्यावर हा चित्रपट एक एक पाकळी उलगडावी त्या पद्धतीने उलगडत जातो. प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते. त्यामुळे हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतो. परंतु, काही ठिकाणी अनेकदा विरोधाभास असल्याचंही पाहायला मिळतं. एकीकडे सरकारी कारभार कसा कासवाच्या गतीने चालतो हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर तो कसं वर्षानुवर्ष हालअपेष्टा भोगतो हे दाखवण्यात आलं आहे.

कलाकारांचा अभिनय

या चित्रपटाच्या माध्यमातून यामीने पुन्हा एकदा तिच्या दमदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. यामी या चित्रपटात नैना जायसवाल या भूमिकेत पूर्णपणे समरसून गेली आहे. यामीचा हा अभिनय आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर चित्रपटात जावेद खान ही भूमिका अतुल कुलकर्णी यांनी साकारली आहे. नेहमीप्रमाणे अतुल कुलकर्णीनेदेखील त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तसंच डिंपल कपाडिया आणि नेहा धुपिया यांनीही त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडयामी गौतमअतुल कुलकर्णीनेहा धुपियाडिम्पल कपाडियासिनेमा