गायक मिका सिंह (Mika Singh) सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याने इंडस्ट्रीविषयी अनेक खुलासे केले आहेत. यातच बिपाशा बसू आणि तिचा नवरा करणसिंह ग्रोवर यांच्याबाबतीत मिकाने सांगितलेलं सत्य ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. २०२० साली आलेल्या 'डेंजरस' सीरिजचा हा विषय आहे. नक्की काय म्हणाला मिका सिंह वाचा.
गायक मिका सिंहची अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. २०२० साली त्याने 'डेंजरस' या सीरिजची निर्मिती केली होती. हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट होता. 'राज'चे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत मिळून त्याला काम करायचं होतं. मात्र नंतर हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी एक वाईट स्वप्नच बनून राहिला. पॉडकास्ट कडक वर बोलताना मिका सिंह म्हणाला, "डेंजरस मध्ये मेकर्सने करणसिंह ग्रोवरला घेतलं होतं. पण माझं म्हणणं होतं की बजेट पाहता आपण फ्रेश चेहरा घेतला पाहिजे. मला अभिनेत्रीही नवीच हवी होती. मात्र बिपाशाने यात उडी घेतली. ती म्हणाली आम्ही दोघंही या सीरिजचा भाग बनू. ते बजेटमध्ये तर आले पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच बेकार होता."
तो पुढे म्हणाला, "दोघांनी शूटिंगवेळी अनेक अडचणी आणल्या. त्यांच्यासाठी शूटिंग शेड्युलही पुढे ढकलण्यात आलं ज्यात एवढा पैसा लागला होता. मी ५० लोकांच्या टीमला घेऊन एक महिन्यासाठी लंडनला गेलो. पण दोन महिने शूटच सुरु राहिलं. करण आणि बिपाशा विवाहित असल्याने मी दोघांसाठी एकच खोली बुक केली होती. पण त्यांनी वेगवेगळ्या खोलीची मागणी केली. मला तर हे समजलंच नाही. नंतर त्यांनी हॉटेलही बदलायला सांगितलं. आम्ही तेही केलं. सीन शूट करतानाही दोघं नखरे करायचे. स्टंट सीन शूट करताना करणचा पाय फ्रॅक्चर झाला. डबिंगच्या वेळेसही त्याने नखरे दाखवले. दोघंही कारणं देत होते. कधी घसाच खराब आहे तर कधी आणखी काही"
किसींग सीनला दिला नकार
मिका म्हणाला, "ते दोघं पती पत्नी आहेत तरी स्क्रीनवर किस करण्यास त्यांनी काचकूच केली. जेव्हा की हा सीन असणार असं आधीच स्क्रीप्टमध्ये लिहिलं होतं. ही कथेचीच मागणी होती. त्यांनी तसा कॉन्ट्रॅक्टही साईन केला होता. हा सगळा खराब अनुभव पाहता मी फिल्ममेकिंगचं सोडलं."