अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आगामी 'इन्सपेक्टर झेंडे' या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा उद्या ५ सप्टेंबर रोजी ओटीटीवर येत आहे. कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराज जेलमधून पळ काढतो. त्यानंतर इन्स्पेक्टर झेंडे मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम हाती घेतात. या सस्पेन्स थ्रिलरवर सिनेमा आधारित असणार आहे. अभिनेता जिम सरभ चार्ल्सच्या भूमिकेत आहे. यानिमित्त नुकतंच मनोज वाजयेपींनी मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी मुंबई सोडण्यावर वक्तव्य केलं.
'अमर उजाला'ला दिलेल्या मुलाखतीत सिनेमाविषयी ते म्हणाले, "जेव्हा मला सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली तेव्हा वाटलं की एक गंभीर थ्रिलर फिल्म असेल. पोलिसांच्या संघर्षाची कथा असेल. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा फार मजा आली. मला सारखं हसू येत होतं. स्क्रिप्टमध्ये कॉमेडी बळजबरी घुसवली आहे असं कुठेच वाटलं नाही. यात अभिनय करताना काहीतरी नवीन करायची संधी मिळेल असंही वाटलं."
मनोज वाजपेयींना प्रश्न विचारण्यात आला की, 'कधी इंडस्ट्री किंवा मुंबई सोडून जाण्याचा विचार आला का?' यावर ते म्हणाले,"अभिनयापासून दूर जाईन असा विचार तर माझ्या मनात कधीच आला नाही. माझं अभिनयावर खूप प्रेम आहे. पण मुंबई सारखं मोठं शहर हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे असं नक्कीच वाटलं. मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही. मी आजपर्यंत या मोठ्या शहराचा होऊ शकलो नाही त्यामुळे सगळं सोडून जायचं अनेकदा मनात आलं. एक वय असं येईल जेव्हा मी खरंच हे शहर सोडेन."