Manjiri Pupala Acting Journey: सध्या मराठमोळ्या मंजिरी पुपाला (Manjiri Pupala) हिची सगळीकडे चर्चा सुरू आहे. रीमा कागती दिग्दर्शित 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या चित्रपटात तृप्तीची भूमिका साकारल्याबद्दल मंजिरी पुपालाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एवढंच नाही तर मंजिरी ही अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत 'धडक २'मध्ये झळकणार आहे. छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या मंजिरीने आज लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या मंजिरी पुपालाचा हा अभिनयाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला, हे तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊयात.
मंजिरी पुपाला हिनं नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिनं अभिनय क्षेत्रात कशी आली, याबद्दल सांगितलं. एका नाटकात अभिनेत्री वीणा जामकर हिला अभिनय करताना पाहिल्यावर इंजिनिअरींगची तयारी करणाऱ्या मंजिरीचं अभिनयाशी नातं जोडलं गेलं. मुलाखतीमध्ये मंजिरीनं सांगितलं की, "मला पहिल्यापासून इंजीनअर बनायचं होतं. मी आयआयटीसाटी जेईईची तयारी करत होते. अभिनेत्री वीणा जामकरला मी अभिनय करताना पाहिलं आणि अभिनयाच्या प्रेमातच पडले. तेव्हा इंजीनियरिंग नाही तर अभिनयचं करायचं ठरवलं".
वडिलांना असलेल्या नाटकांच्या आवडीबाबत ती म्हणाली, "लहानपणापासून माझ्या घरात नाट्य संस्कृती खूप जास्त जोपासली गेली आहे. माझ्या बाबांना नाटक आणि सिनेमे पाहण्याची आवड होती. मराठी नाटक ही फक्त मनोरंजन करणारी नाही, तर समाजात बदल घडवणारी नाटक होती. त्यामुळे माझे बाबा स्वता:च्या पैशांनी तिकिट खरेदी करायचे आणि वाटायचे. एकदा तर त्यांना ब्लॅकमध्ये तिकिट विकतोय असं समजून एका पोलिसाने पकडलं होतं. त्यामुळे माझ्यावर जे संस्कार झालेत, त्यात नाटकांना खूपच मानाचं स्थान आहे.
अभिनय क्षेत्रात आल्यानंतर वीणा जामकर हिनं लहान बहिणीप्रमाणे काळजी घेतल्याचं मंजिरीनं सांगितलं. "आता गेली कित्येक वर्ष मी आणि वीणा मैत्रिणी आहोत. तिचा अभिनय मला आजही खूप आवडतो. कित्येक वर्ष कॉलेजनंतर अगदी एक मोठी बहिण म्हणून हात पकडून तिनं माझं इंडस्ट्रीत मार्गदर्शन केलं. आता तिला माझा खूप आभिमान वाटतो. खरं तर इंडस्ट्रीत लोकांना वाटायचं की आम्ही दोघी बहिणी आहोत. तिला हे काही करायचं गरज नव्हती. पण, मी खरचं स्वत:ला भाग्यवान समजते की माझ्या या प्रवासात मला अनेक महिला कलाकार भेटल्या, ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्यामुळेच मी आज याठिकाणी आहे. जेव्हा मी पुढचं पाऊल ही मालिका करत होते, तेव्हा हर्षदा खानविलकर यांनी मला सांगितलं होतं की तु हिंदी इंडस्ट्रीमध्ये जा. तू तिथे जास्त चांगलं काम करु शकशील. माझ्या आयुष्यात आलेल्या महिलांनी खूप प्रेरणा दिली आहे".