Join us

LMOTY 2018 : श्रेया घोषालचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 21:42 IST

आपल्या गोड गायकीने तमाम संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका श्रेया घोषाल हिला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर 2018  या ...

आपल्या गोड गायकीने तमाम संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका श्रेया घोषाल हिला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर 2018  या पुरस्कारानं गौरवण्यात आले. परफॉर्मिंग आर्टस या गटात श्रेयाने बाजी मारली. श्रेयाने हिंदी तथा मराठीमध्येही गाणी गायिली असून, आजही तिच्या सुरांची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.   लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर  पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्र ीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात श्रेयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रेया घोषालने आपल्या आवाजाने सगळ्यांच्याच मनात घर केले आहे. संजय लीला भन्सालीच्या ‘देवदास’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल टाकणाºया श्रेयाने ‘डोला रे’च्या तालावर सगळ्यांनाच डोलवलं. त्यानंतर, मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. उलट, लोकप्रियतेची नवनवी शिखरे तिने सर केली आणि आज सर्वोत्तम गायकांच्या पंक्तीत तिने स्थान मिळवले आहे. केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील एकापेक्षा एक सरस गाणी श्रेयाने गायली आहेत. सगळ्याच पठडीतील गाणी ती तितक्याच ताकदीने गाते. अनेक मानाच्या पुरस्कारांवर तिने नाव कोरले आहे. त्यात आता,  लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर ची ट्रॉफीही उठून दिसतेय. ‘देवा’ या चित्रपटात श्रेयाने गायलेले रोज रोज नव्याने  हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. या रोमँटिक गाण्यात श्रेया घोषालला सोनू निगमची साथ लाभली आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. हे गाणे प्रेमीयुगुलांसाठी तर पर्वणी ठरले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून, अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘देवा’ या चित्रपटात प्रेक्षकांना माया आणि देवाची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. माया ही लेखिका तर देवा हे अतरंगी कॅरेक्टर आहे. अंकुश चौधरीने साकारलेल्या देवासारखीच मायाही अतरंगीच आहे. ती कुठलीही गोष्ट ठरवून करत नाही. ती सतत फिरतीवर असते आणि नावीन्य शोधण्याचा प्रयत्न करत असते. मायाच्या अतरंगीपणाला श्रेयाने तिच्या आवाजात लोकांसमोर आणले आहे.