Join us  

लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 3:44 PM

लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप सावत्र वडिलांवर होता होता. या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक यांनी दोषी ठरवत तब्बल १३ वर्षांनी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील सेशन कोर्टाने दोषी ठरवलं होतं. आता त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक यांनी दोषी ठरवत तब्बल १३ वर्षांनी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. 

शुक्रवारी (२४ मे) रोजी कोर्टाने परवेज टाक यांना फाशीची शिक्षा सुनावली. हत्येनंतर तब्बल १३ वर्षांनी लैला खान आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळाला आहे. २०११ मध्ये लैला तिची आई शेलिना पटेल आणि अन्य चार भावंडांसोबत मिसिंग असल्याची तक्रार तिचे वडील नादिर पटेल यांच्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. 

यादरम्यान पोलिसांना नाशिकजवळील इगतपुरी येथे एक आगीने अर्ध जळलेलं फार्महाऊस सापडलं होतं. लैला खानच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनही नाशिकमध्येच दाखवत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर संशयाची सुई अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांवर गेली. त्या फार्महाऊसमध्येच परवेज यांनी लैला खानचा मृतदेह पुरला होता. इगतपुरीमधील बंगल्यातच संपत्तीवरुन त्याच्यांत वाद झाले होते. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी पत्नी शेलीनाची हत्या केली. शेलीनाची हत्या करताना पाहिल्यामुळे परवेजने लैला, तिची बहीण अमीना, जुळे भाऊ बहीण आणि चुलत बहीण रेश्माची हत्या केली होती. हत्येनंतर त्याच बंगल्यात त्यांनी मृतदेह पुरले होते. 

लैला खानने २००२ मध्ये कन्नड सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण केलं होतं. 'मेकअप' या कन्नड चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर राजेश खन्ना यांच्या 'वफा : अ डेडली लव्ह स्टोरी' या सिनेमात तिने काम केलं होतं. लैला खानचं बॉलिवूड करिअर अपयशी ठरलं. तिला बॉलिवूडमध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही.

टॅग्स :सेलिब्रिटीगुन्हेगारी