KRK Arrest Memes : आपल्या रोज नव्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणारा अभिनेता कमाल राशीद खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरकेला आज पोलिसांनी अटक केली. 2020 साली केलेलं एक वादग्रस्त ट्वीट त्याला महागात पडलं. आज दोन वर्षानंतर केआरके मुंबईत आला आणि मुंबई विमानतळावरूनच पोलिसांनी त्याला उचललं. लगेच त्याला मुंबईतील बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.बॉलिवूड सेलिब्रिटींची खिल्ली उडवणारा, त्यांच्याबद्दल नको ते बोलणारा केआरके तुरूंगात पोहोचल्यावर सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. सध्या सोशल मीडियावर केआरकेच्या अटकेवरचे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. केआरकेला अटक झाल्यानंतर नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कलम २९४ अंतर्गत केआरकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण केआरकेच्या कोणत्या ट्वीट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2020मध्ये केआरकेने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. युवा सेने संघटनेचे सदस्य राहुल कनल यांनी ही तक्रार दाखल केली होती.
केआरके हा अभिनेता आहे. कथा लेखक, निर्माता सुद्धा आहे. याशिवाय तो स्वत: ला सिनेसमीक्षक समजतो. 2009 मध्ये केआरके बिग बॉस शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तेव्हा पासूनच तो चर्चेत आहे. त्यानं ‘देशद्रोही’ नावाचा एक सिनेमा केला होता.