मुंबईतील प्राइम लोकेशनवर हक्काचं घर असावं हे प्रत्येक सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची मुंबईत वांद्रे येथे सी फेसिंग घरं आहेत. या यादीत आता बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनचंही नाव जोडलं गेलं आहे. क्रितीने नुकतंच वांद्रे पश्चिम येथील पाली हिलमध्ये एक डुप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केलं आहे. तिचं हे पेंट हाऊस सी फेसिंग आहे. सुप्रीम प्राण रेसिडेंशियल टॉवरमध्ये कृतीचं हे पेंटहाऊस आहे. या पेंटहाऊसची किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल.
द इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, क्रिती सेनॉनचं हे नवं घर १४ आणि १५ व्या मजल्यावर आहे. ६ हजार ६३६ स्क्वेअर फूटमध्ये क्रितीचं हे पेंटहाऊस पसरलं आहे. यासोबतच तिने पार्किंगही खरेदी केली आहे. क्रितीच्या या आलिशान पेंटहाऊसची किंमत तब्बल ७८.२० कोटी इतकी आहे. स्टॅम्पड्युटी आणि जीएसटीसह क्रितीच्या या पेंटहाऊसची किंमत ८४.१६ कोटी इतकी होते. याआधी क्रितीने अलिबागमध्ये प्लॉट खरेदी केला होता. क्रितीचा वांद्रे येथेच आणखी एक फ्लॅट आहे. ज्याची किंमत ३५ कोटी इतकी आहे.
दरम्यान, क्रिती 'तेरे इश्क मे' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती धनुषसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. यासोबतच 'कॉकटेल २' मध्येही क्रिती दिसणार असल्याची चर्चा आहे.