पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगचा एक मोठा चाहतावर्ग आज देशभरात आहे. आपली गाण्याच्या हटके स्टाइल आणि स्वॅगमुळे हनी सिंगनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या सगळीकडे यो यो हनी सिंगची चर्चा रंगली आहे. हनी सिंग पुन्हा एकदा आपल्या एका दमदार गाण्यासह परतला आहे. हनी सिंगचं कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या आगामी चित्रपट "किस किसको प्यार करूं २" मधील "फर" (PHURR) हे पार्टी गाणे नुकतेच प्रदर्शित झालं आहे.
"फर" हे गाणे एका मोठ्या स्टेडियममध्ये चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे हनी सिंग आणि जोश ब्रार यांनी गायले आहे. गाण्याला संगीतही खुद्द हनी सिंगनेच दिले आहे. तर बोल राज ब्रार यांनी लिहिले आहेत. गाण्याबद्दल बोलताना हनी सिंग म्हणाला, "कपिल माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याच्या 'किस किसको प्यार करूं २' या चित्रपटासाठी गाणे तयार करताना खूप मजा आली".
दरम्यान, अलिकडेच हनी सिंगचं अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत 'चिलगम' गाणं तुफान व्हायरल झालं झालं होत. पण, अनेकांना मलायका हिचा डान्स आवडला नाही. गाण्याच्या कोरिओग्राफीवर चाहत्यांनी टीका केली आणि मलायकाच्या डान्सला 'अश्लील' म्हटलं.
'किस किस को प्यार करूं २' कधी प्रदर्शित होणार?
कपिल शर्मा 'किस किस को प्यार करूं २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात तो एक दोन नाही तर थेट चार अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अनुकुल गोस्वामी दिग्दर्शित असलेला हा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. कॉमेडीने भरपूर असलेल्या या चित्रपटात कपिलला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.