Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानसाठी किरण रावने गायले मराठीत गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 13:19 IST

अजय-अतुल ही मराठी संगीतकारांची जोडी म्युझिक व्हिडीओ बनवणार असून आमिर खानची पत्नी किरण राव ही यासाठी गाणे गाणार आहे.

जलसंरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानांतर्गत अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी जागरूकतेसाठी एक म्युझिक व्हिडीओ बनवण्याचे जाहीर केले आहे. अजय-अतुल ही मराठी संगीतकारांची जोडी म्युझिक व्हिडीओ बनवणार असून आमिर खानची पत्नी किरण राव ही यासाठी गाणे गाणार आहे. एवढेच नाही तर ‘सैराट फेम’ अभिनेता आकाश थोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू हे मराठी कलाकार या व्हिडीओत दिसतील. गीतकार गुरू ठाकूर यांनी हे गाणे लिहिले असल्याची माहिती देखील सुत्रांकडून कळतेय.                             गतवर्षी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी राज्य सरकाराच्या ‘जलयुक्त शिबीर अभियान’ मध्ये सहभाग घेतला होता. या अभियानांतर्गत  पाण्याच्या कमतरतेमुळे कोरडेठाक पडणाऱ्या  गावांसाठी पाणी संरक्षित केले जाते. आमिर खानने अनेक गावांमध्ये या उपक्रमाला एका स्पर्धेचं रूप दिले आहे. या स्पर्धेला ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ असे नाव देण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यात राज्यातील ३० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या म्युझिक व्हिडीओविषयी बोलताना आमिर म्हणाला,‘या व्हिडीओत किरण मराठीतून गाणार आहे. तसेच गाण्यात माझ्यासह ‘सैराट जोडी’ आणि इतर कलाकारही दिसतील. हा अतिशय चांगला व्हिडीओ असून नागराज मंजुळे हे या व्हिडीओचे दिग्दर्शन करत आहेत. ’ आमिर खान सध्या ‘दंगल’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने केलेली महावीर फोगट याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांना पहलवान बनवण्याच्या त्यांच्या प्रवासावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर पहिल्याच आठवड्यात खुप कमाई केली आहे.