करण जोहरने शेअर केला मुलांचा पहिला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:56 IST
करण जोहरने पहिल्यांदाच सोशल मीडियावर त्याच्या मुलांचा फोटो शेअर केला आहे. रुही आणि यश ही त्याची दोन्ही मुले खूपच गोंडस आहेत.
करण जोहरने शेअर केला मुलांचा पहिला फोटो
करण जोहर पिता झाला ही बातमी मीडियामध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच त्याची मुले पाहाण्याची उत्सुकता होती. पण त्याने त्याच्या मुलांना मीडियापासून दूर ठेवणेच पसंत केले होते. त्याची मुले सहा महिन्याची झाली असली तरी त्याने त्यांचा फोटो सोशल मीडियाला शेअर केला नव्हता. काही दिवसांपूर्वी मला माझ्या मुलांची खूप आठवण येतेय असे कॅप्शन देत करणने एक फोटो पोस्ट केला होता. आयफा अॅवार्डसाठी करण न्यूयॉर्कला गेला असल्याने तो त्याच्या दोन्ही मुलांना खूप मिस करत होता. त्यामुळेच त्याने त्यांचा फोटो पोस्ट केला होता. पण या फोटोत केवळ त्याच्या मुलांचे हातच दिसत होते. पण आता रक्षाबंधनच्या निमित्ताने त्याने त्याच्या मुलांचा पहिला फोटो शेअर केला आहे. करण जोहरने रुही आणि यश या आपल्या जुळ्या मुलांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत रुही आणि यश त्यांची आजी हिरू जोहरच्या मांडीवर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. करणची दोन्ही मुले खूपच गोंडस आहेत. करणने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेक लाइक्स आणि कमेंट्स देखील मिळत आहेत. याच वर्षी करणने सरोगसीद्वारे त्याच्या जुळ्या मुलांना जन्म दिला. सोशल मीडियावरून जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे करणने जाहीर केले होते. मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. माझ्या आयुष्यात रूही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांनी प्रवेश केला आहे. वयाच्या ४४ वर्षी मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो. हे माझे सगळ्यांत मोठे ब्लॉकबस्टर आहे. सध्या सतत मी त्यांना न्याहाळत बसतो. मी दोन मुलांचा बाप झालोय, यावर माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. या दोन चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर केला, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. Also Read : रक्षाबंधनच्या निमित्ताने अभिषेक बच्चनने पोस्ट केला लहानपणीचा फोटो