अभिनेत्री कंगना राणौतचा ‘जजमेंटल है क्या’ हा अलीकडे प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. लवकरच कंगना तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘जया’ या बायोपिकमध्ये झळकणार आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तिचे काही फोटो व्हायरल होत आहे. कंगनाच्या टीमने हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत कंगना प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसत आहे. म्हणजेच, प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने कंगना जयललितांचा लूक साकारणार आहे. या प्रोस्थेटिक मेकअपमुळे कंगनाला श्वास घेण्यास अडथळा येत होता. पण तरीही तिने नेटाने हे मेकअप केले.
काही दिवसापूर्वीच लूक टेस्ट करण्यासाठी ती लॉस एंजलिससाठी रवाना झाली होती. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट जॅसन कोलिंस यांनी ही लूक टेस्ट घेतली. जॅसन यांनी कॅप्टन मार्वेल आणि ब्लेड रनर 2049 या चित्रपटांसाठी काम केले आहे.