Join us  

स्मृती इराणींनी केलेल्या मासिक पाळीबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर कंगना म्हणते, "वर्किंग वुमन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 1:05 PM

"महिलांना भरपगारी मासिक पाळी रजा दिली जाऊ नये", स्मृती इराणींच्या विधानावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली, "Period म्हणजे..."

देशाच्या महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत केलेल्या मासिक पाळीच्या विधानाची सर्वत्र चर्चा आहे. महिलांना मासिक पाळीत भरपगारी रजा देण्याचा कोणताही विचार सरकार करत नसल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं होतं. त्यांच्या या विधानानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत होत्या. आता त्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

कंगना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा समाजातील घडामोडींबाबत पोस्टद्वारे कंगना तिचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसते. आता स्मृती इराणींच्या महिलांना मासिक पाळीत भर पगारी रजा न देण्याच्या विधानावरुन कंगनाने इन्स्टाग्राम पोस्टमधून भाष्य केलं आहे. स्मृती इराणींच्या विधानाच कंगनाने समर्थन केलं आहे. "वर्किंग वुमन हे एक मिथ आहे. मानवाच्या इतिहासात अशी काम न करणारी एकही महिला नाही. शेतीच्या कामापासून ते घरातील काम आणि मुलांचं संगोपन करण्यापर्यंत...महिलांनी नेहमी काम केलं आहे.  कुटुंब, समाज आणि राष्ट्राशी असलेल्या बांधिलकीत काहीच येऊ शकत नाही. तशीच काही वैद्यकिय परिस्थिती निर्माण होण्याव्यतिरिक्त महिलांना मासिक पाळीत भरपगारी रजेचे गरज नाही. मासिक पाळी म्हणजे आजार किंवा अपंगत्व नाही, हे समजून घ्यायला हवं," असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

स्मृती इराणींनी काय म्हटलं होतं? 

महिलांना मासिक पाळीत भरपगारी रजा देण्याचा कोणताही विचार सरकार करत नाहीये. हा महिलांच्या जीवनाचा एक भाग असून याकडे आपण दिव्यांगत्व म्हणून पाहू नये. महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल, असं त्या म्हणाल्या. मासिक पाळीसंदर्भातील स्वच्छतेच्या चर्चेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. राष्ट्रीय स्तरावर तयार केलेल्या मसुद्याचाही त्यांनी उल्लेख केला. अनेक संबंधितांशी बोलून हा मसुदा तयार करण्यात आल्याचं इराणी यांनी सांगितलं. देशभरात मासिक पाळीबद्दल जागरुकता पसरवणे आणि स्वच्छतेशी संबंधित वस्तूंचा वापर वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे. 

टॅग्स :कंगना राणौतस्मृती इराणीमासिक पाळी आणि आरोग्य