नुकताच सर्वांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. मनोरंजनविश्वातही अनेक भावाबहिणींच्या जोड्या आहेत. एकमेकांमधील कडवटपणा दूर करुन या दिवशी भाऊ बहिण एकत्र येतात. राज बब्बर यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल दिसत नाही. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरने (Prateik Babbar) त्याच्या सावत्र बहिणी भावापासून नातं तोडलं आहे. स्वत:च्या लग्नाला त्याने वडिलांना आणि भाऊबहिणीला बोलवलं नाही. तेव्हाच ही चर्चा झाली होती. आता रक्षाबंधनालाही तो बहिणीकडे गेला नाही. त्याची सावत्र बहीण जूही बब्बरने (Juhi Babbar) सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.
जूही बब्बरने सख्खा भाऊ आर्य बब्बरला राखी बांधली. हा फोटो शेअर करत ती लिहिते, "काही आनंदाचे क्षण पूर्णत: साजरे होतात तर काही अधुरेच राहतात. आज रक्षाबंधनाचा आनंदाचा दिवस आम्ही साजरा करतोय. पण माझ्या मनाचा एक भाग अजूनही हरवलेला आहे. पण आयुष्य पुढे जात राहतं आणि रक्ताचं नातं कोणीही बदलू शकत नाही. खरं रक्त कायम सोबत राहतं."
जूहीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लिहिले, 'प्रतीक दिसत नाही याचं वाईट वाटतंय','प्रतीक आता तुमचा भाऊ राहिला नाही का?'. राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा प्रतीक हा मुलगा आहे. आधी तो राज बब्बर यांच्या पहिल्या कुटुंबाशी जोडलेला होता. त्याचं सावत्र भाऊ बहिणीसोबतही छान नातं होतं. मात्र अचानक गोष्टी बिघडल्या. प्रतीकने काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांना बोलवलं नाही. यावरुन भावाबहिणीमध्ये बिनसल्याची चर्चा झाली.