Join us

जयललितांचे निधन : सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे शोकसंदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:02 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि तमाम जनतेच्या ‘अम्मा’ जयलतितांच्या निधनाची बातमी आल्यांनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. चित्रपट अभिनेत्री ते राजकारण ...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि तमाम जनतेच्या ‘अम्मा’ जयलतितांच्या निधनाची बातमी आल्यांनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. चित्रपट अभिनेत्री ते राजकारण ते मुख्यमंत्री असा देदिप्यमान प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या जयललितांची लोकप्रियता अफाट होती. अनेक राजकारणी आणि बॉलीवूड सेलिब्रेटिंनी सोशल मीडियावर शोकसंदेश पोस्ट केले.  महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, ‘जयललिताजींच्या निधनामुळे अपार दु:ख झाले. त्या एक शक्तीशाली महिला होत्या. भारतीय सिनेसृष्टीची शतकपूर्ती साजरी करणाऱ्या त्या एकमेव मुख्यमंत्री आहेत. संपूर्ण देशभरात त्यांचे हितचिंतक आणि चाहते आहेत.’ दाक्षिणात्य सुपरस्टार आणि ‘थलैवा’ रजनीकांत यांनीदेखील ट्विटरवर तमिळ भाषेतून लिहिलेल्या संदेशाद्वारे आपल्या दु:खद भावना व्यक्त केल्या. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने लिहिले की, जयललिताजींची निधन वार्ता ऐकून खूप दु:ख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. दाक्षिणात्य अभिनेता धनुषने ट्विट केले की, ‘आयर्न लेडी’ जयललितांच्या निधनासोबतच तामिळनाडूच्या राजकारणातील सर्वात प्रेरणादायी काळाचा अंत झाला. तुमच्या जाण्याने कधीच न भरणारी पोकळी निर्माण झाली. अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनीनेसुद्धा जयललितांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, ‘त्या एक सक्षम आणि प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या व्यक्ती होत्या. राजकारणाच्या पटलावर त्यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे.’ शत्रुघ्न सिन्हांनी ट्विट करून खेद व्यक्त केला. ‘तमाम चाहते आणि समर्थकांच्या प्रार्थनांना इच्छित यश लाभले नाही. प्रेरणादायी अम्मांच्या निधनाने देश आणि तामिळनाडू राज्याला मोठी हानी झाली आहे. गायक कैलाश खेरने म्हटले की, मुख्यमंत्री जयललिता त्यांच्या लाखो समर्थकांच्या हृदयात कायम जिवंत राहणार. कलाकाराचे मन असणाऱ्या राजकारणी असे मी त्यांचे वर्णन करेल. माजी क्रिकेट खेळाडू विरेंद्र सेहवागने ट्विट केले की, तामिळनाडूमध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या प्रियजणांना या दु:खाच्या काळात शक्ती व सामर्थ्य लाभो. क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनी शोकसंदेशात म्हटले की, जयललिता एक असामान्य व्यक्ती होत्या.