Javed Akhtar Post : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर त्याच्या या निर्णयाने असंख्य चाहत्यांना धक्का बसला. रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाने अनेकजण निराश झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत विराटने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिडाविश्वासह कलाकार मंडळी देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी विराट कोहलीसाठी खास पोस्ट करत त्याला विनंती देखील केली आहे.
जावेद अख्तर यांनी विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर एक्सवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय की, "विराटला याबाबतीत माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. पण, या महान खेळाडूचा चाहता असल्याने मी खूप निराश झालो आहे. कारण मला असं वाटतं की विराज अजून बराच काळ क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे मी विराटला विनंती करतो की त्याने या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा." असं म्हणत त्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द
विराट कोहलीनं २० जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. १२३ कसोटी सामन्यात ३० शतकांसह ३१ अर्धशतकांच्या जोरावर त्याने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे. २५४ ही कसोटीतील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.