दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करून गणेशभक्तांनी अखेर काल आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाही विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे. लालबागचा राजाची भव्य विसर्जन मिरवणुक हा कायमच चर्चेचा विषय असतो. अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसतात. यंदाही सेलिब्रिटींनी राजाचं दर्शन घेण्यासोबतच त्याच्या विसर्जन मिरवणुकीतही हजेरी लावली.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरदेचा बॉयफ्रेंड शिखर पहारियादेखील यंदा लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. विसर्जन मिरवणुकीतील फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. "लालबागचा राजाचा विजय असो! गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या... स्वप्नांचं शहर अडथळे दूर करणाच्या चरणी नतमस्तक होते", असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. लालबागचा राजाच्या मिरवणुकीच्या गुलालाने शिखर पहारियाचा चेहरा माखलेला दिसत आहे.
दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकमेकांना डेट करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. ते एकत्र व्हॅकेशनलाही जात असतात. जान्हवीप्रमाणेच तिचा बॉयफ्रेंड शिखरही धार्मिक आहे. ते दोघेही एकत्र अनेक प्रार्थनास्थळे आणि मंदिरांना भेटी देत असतात.