Join us  

सलमान माझे कपडे व बूट सांभाळायचा, मीच ब्रेक मिळवून दिला! जग्गू दादाचा मोठा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:39 AM

जॅकी श्रॉफ व सलमान खान यांची मैत्री आजची नाही. अगदी सलमान मॉडेलिंग करत होता, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, तेव्हापासून ही मैत्री आहे.

ठळक मुद्देनुकत्याच रिलीज झालेल्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात जॅकी व सलमानची जोडी दिसली. या सिनेमात जॅकीने सलमानच्या बॉसची भूमिका साकारली आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan ) याने अनेकांशी पंगा घेतलाये. पण म्हणून इंडस्ट्रीत त्याचे जिगरी यार कमी नाहीत. असे काही लोक आहेत, ज्यांच्यावर भाईजान जीव ओवाळून टाकतो. जग्गू दादा त्यापैकीच एक. होय, जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) व सलमान खान यांची मैत्री आजची नाही. अगदी सलमान मॉडेलिंग करत होता, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, तेव्हापासून ही मैत्री आहे. जॅकी त्यावेळी सुपरस्टार होता आणि सलमान एक नवखा तरूण. जॅकीचे मानाल तर, त्याच्याचमुळे सलमानला पहिला ब्रेक मिळाला. (Salman Khan and Jackie Shroff’s friendship )होय, एका ताज्या मुलाखतीत खुद्द जॅकीने हा खुलासा केला. सलमानबद्दल तो भरभरून बोलला. त्याची आणि सलमानची पहिली भेट कुठे झाली, हेही त्याने सांगितले.

तो माझे कपडे व बूट सांगाळायचा...ऐकून आश्चर्य वाटेल पण सलमान जॅकीचे कपडे व बूट सांभाळायचा. जॅकीने सांगितले, सलमान एक मॉडेल होता आणि नंतर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. 1988 साली ‘फलक’ या सिनेमाच्या सेटवर तो माझे कपडे व बूट सांभाळायचा. लहान भाऊ मोठ्या भावाची काळजी घेतो, तशी माझी काळजी घ्यायचा. सलमान असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, पण मी त्याचे फोटो निर्मात्यांना दाखवायचो. अखेर केसी बोकाडिया यांच्या ब्रदर-इन-लॉने सलमानला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून सलमानला स्टारडम मिळाले. मला विचाराल तर माझ्याचमुळे इंडस्ट्रीत त्याला ब्रेक मिळाला होता. मग आमची चांगली मैत्री झाली. आम्ही खूप क्लोज आहोत. एखादा मोठा प्रोजेक्ट आला की तो सर्वप्रथम माझ्या नावाचा विचार करतो, असेही जॅकीने सांगितले.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात जॅकी व सलमानची जोडी दिसली. या सिनेमात जॅकीने सलमानच्या बॉसची भूमिका साकारली आहे. त्याआधी ‘भारत’ या सिनेमातही जॅकी व सलमान एकत्र दिसले होते.

टॅग्स :सलमान खानजॅकी श्रॉफ