Join us  

सलमान खानबद्दल जावेद जाफरीने केले ट्विट, झाला ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 6:51 PM

कुठलीही खातरजमा न करता केलेल्या या ट्विटमुळे अभिनेता जावेद जाफरीवर ट्रोल होण्याची वेळ आली. 

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण देश एकवटला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही केरळवासियांना मदतीचा हात दिला. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, कंगना राणौत, शाहरूख खान यासारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी केरळला मदत केली. अशात अभिनेता जावेद जाफरीच्या एका ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जावेदने सलमान खानबद्दल एक ट्विट केले. होय, सलमानने केरळमधील पूरग्रस्तांना १२ कोटी रूपयांची मदत दिल्याचे ट्विट त्याने केले. पण हे ट्विट त्याच्या भलतेच अंगलट आले. 

कुठलीही खातरजमा न करता केलेल्या या ट्विटमुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली. कारण केरळच्या मदतीसाठी ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदत दिली, त्या सर्वांचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आभार मानलेत. पण या यादीत सलमान खानचे नाव नाही. जावेद जाफरीला आपली चूक कळली आणि त्याने आपले ट्विट डिलीट केले. मग काय, याबद्दल त्याला खुलासा द्यावा लागला. 

सलमानच्या केरळ मदतीबद्दल मी ऐकले आणि त्याचे याआधीचे कार्य बघता, मला ते खरे वाटते. पण हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी माझे ट्विट मागे घेतोय, असा खुलासा त्याने केला.अभिनेता जावेद जाफरीने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मेरी जंग, १०० डेज, ओह डार्लिंग ये है इंडिया, बूम, सलाम नमस्ते, ता रा रम पम, सिंग इज किंग, धमाल, डबल धमाल, थ्री इडियट्स यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला डान्सर आहे. त्याच्या नृत्य कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते. जावेद जाफरी हा अभिनेते जगदीप यांचा मुलगा असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. जगदीप हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :जावेद जाफरीसलमान खानट्विटर