Join us  

लंडनमध्ये उपचार सुरू असताना देखील इरफान खान करणार 'कारवां'चे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:38 PM

अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. ट्रीटमेंटमुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

ठळक मुद्दे'कारवां' चित्रपट होणार 3 ऑगस्टला प्रदर्शित  'कारवां' चित्रपटाची कथा फिरते तीन अनोळखी लोकांच्या अवतीभवती

अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. ट्रीटमेंटमुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. मात्र सध्या भारतात येण्याचा त्याचा काही प्लान नाही. लंडनमध्ये राहूनच तो उपचार घेणार आहे. पण, सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, इरफान आगामी चित्रपट 'कारवां'चे प्रमोशन करणार आहे. 

'कारवां' चित्रपट 3 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान तो भारतात नसणार आहे. पण, या सिनेमाचे प्रमोशन तो करणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या प्रीती राठी गुप्ता यांनी सांगितले की,' इरफान खान आमच्यासोबत चित्रपटाच्या प्रमोशनवेळी उपस्थित नसणार आहे. पण तो सोशल मीडियावर सक्रीय राहून प्रमोशन करणार आहे. हा काळ डिजिटल माध्यमाचा असून सोशल मीडियावर जगभरातील लोक सक्रीय आहेत. त्यामुळे या माध्यमावर 'कारवां' चित्रपटाचे प्रमोशन करणे फायदेशीर ठरणार आहे. आम्हाला चित्रपटाच्या प्रमोशनवेळी इरफानची उणीव नक्कीच भासणार आहे.' 'कारवां' चित्रपटाची कथा तीन अनोळखी लोकांच्या अवतीभवती फिरणारी आहे. एका अनपेक्षित वळणावर त्यांची ओळख होते. आयुष्याकडे पाहण्याचा या तिघांचाही वेगवेगळा दृष्टिकोन असतो. पण आयुष्यातील काही घटना या तिघांनाही एकत्र आणतात, हे सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट केरळच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटातून मल्याळम अभिनेता दलकीर सलमान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दलकीरने 'ओके कनिमनी', 'चार्ली' यांसारख्या बऱ्याच हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मिथिला पालकर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करते आहे. मिथिला 'लिटिल थिंग्स' या वेबसीरिजमधून लोकप्रिय झाली आहे. तसेच तिने मराठी चित्रपट 'मुरांबा'मध्ये देखील काम केले आहे. त्यामुळे दोघांसाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. 

टॅग्स :इरफान खानमिथिला पालकर