Join us  

आजारपणानंतर घटले इरफानचे वजन, ताजा फोटो आला समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 3:46 PM

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान सध्या लंडनमध्ये आपल्या दुर्धर आजारावर उपचार घेतोय. खुद्द इरफाननेच सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान सध्या लंडनमध्ये आपल्या दुर्धर आजारावर उपचार घेतोय. खुद्द इरफाननेच सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. अगदी अलीकडे इरफानने एक भावूक पत्र लिहून चाहत्यांना भावूक केले होते. मी कधी परतणार, मला ठाऊक नाही़ पण जे काही सुरू आहे, ते सगळे लवकरात लवकर संपावे,अशी माझी इच्छा आहे, असे इरफानने लिहिले होते. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, इरफानचा ताजा फोटो समोर आला आहे. आपल्या ट्विटर प्रोफाईलवर त्याने हा ताजा फोटो लावला आहे. या फोटोत इरफानचे वजन बरेच कमी झाल्याचे जाणवते. पण तो हसतोय, त्याच्या चेहऱ्यावर निखळ हास्य आहे. त्याचा हा हसरा चेहरा नक्कीच चाहत्यांसाठी एक मोठी भेट आहे.

 मला हाई-ग्रेड न्यूरोएंडोक्राइन कॅन्सरचे निदान होऊन आता काही काळ लोटला आहे. या आजारामुळे माझ्या शब्दकोशात एका नव्या शब्दाची भर पडली आहे. हा एक दुर्मीळ आजार असून, त्याबाबत फारच कमी माहिती आहे. त्यामुळे त्यावर इलाज होण्याची शक्यताही कमी होती. म्हणूनच सध्या मी एका प्रयोगाचा भाग बनलो आहे. मी एका वेगळ्यात खेळात अडकलो होतो. तेव्हा मी एका वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत होतो. तिथे माझी स्वप्ने होती, योजना होत्या, महत्त्वाकांक्षा होत्या, उद्दिष्टे होती. मात्र या सर्वांच्या पसाऱ्यात मी विस्कळीत झालो होतो. तेवढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर थाप मारली. तो टीसी होता त्याने माझा मुक्काम आल्याचे मला सांगितले. मी गोंधळलो. हा माझा मुक्काम नाही, असे त्याला सांगितले. मात्र हेच तुझ्या मुक्कामाचे ठिकाण आहे असे तो म्हणाला. या अनपेक्षित घटनेने मला माझ्या मर्यादा कळल्या. तुम्ही विशाल समुद्रात तरंगणा-या एका लहानशा कॉर्कप्रमाणे असता आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी बैचेन असता, हे त्या अनपेक्षित धक्क्याने मला कळले, असे इरफानने लिहिले होते.

 

टॅग्स :इरफान खान