दिवंगत अभिनेता इरफान खान (irfan khan) आजही सर्वांच्या स्मरणात आहे. इरफान आज जरी आपल्यात नसला तरीही त्याचे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. इरफान उत्तम अभिनेता होताच शिवाय माणूस म्हणूनही संवेदनशील होता. इरफानला स्वतःची वैचारीक बैठक होती. त्यामुळे कोणी कितीही आडवे-तिडवे प्रश्न विचारले तरीही इरफानच्या उत्तराने समोरच्या माणसाची बोलती बंद व्हायची. इरफानचा असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इरफानने लाहोरच्या पत्रकाराची बोलती केली बंद
इरफानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लाहोरला राहणारा एक पत्रकार इरफानला सांगतो की, "हॅलो इरफान भाई! तुमचं पाकिस्तानमध्ये खूप फॅन फॉलोईंग आहे. मी सुद्धा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानमध्ये तुमचे असंख्य चाहते आहेत. माझी इच्छा आहे की, कधीतरी तुम्ही पाकिस्तानमध्ये यावं." यावर इरफानने त्याला एकाच वाक्यात उत्तर दिलं की, "मी पाकिस्तानमध्ये येईल पण पुन्हा रिटर्न येईल ना?" (मैं आ तो जाऊंगा पर वापस आऊंगा की नाही?) इरफानने असं उत्तर दिल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. "तुम्ही नक्की परत याल", असं त्या पत्रकाराने इरफानला आश्वासन दिलं.
अशाप्रकारे इरफानच्या हजरजबाबीपणाचा प्रत्यय सर्वांना आला. इरफानचं २०२० ला कॅन्सरने निधन झालं. इरफानचा लेक अर्थात बाबील खान सध्या बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. याशिवाय इरफान आणि दीपिका पादुकोण यांचा गाजलेला सिनेमा 'पिकू' पुन्हा रिलीज झाला आहे. दीपिकाने यानिमित्त इरफानची आठवण जागवली होती. इरफान आज आपल्यात नसला तरी दर्दी सिनेप्रेमी त्याची आठवण काढल्याबिगर राहत नाहीत.