Join us

इम्तियाज अली यांनी कुटुंबासमवेत पहलगाममध्ये साजरा केला आईचा वाढदिवस; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:52 IST

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आपल्या आईचा ७५ वा वाढदिवस पहलगाममध्ये साजरा केला आहे. 

Imtiaz Ali in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये  (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली होती. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता परिस्थिती पुन्हा पुर्वपदावर येत आहे. दहशतगर्दीवर प्रेम आणि सकारात्मकतेने मात करत पर्यटक पुन्हा एकदा काश्मीरच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. नुकतंच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आपल्या आईचा ७५ वा वाढदिवस पहलगाममध्ये साजरा केला आहे. 

इम्तियाज अली यांनी आईच्या वाढदिवसाचे काही सुंदर फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये सर्व कुटुंबीयांनी एकाच प्रकारचा टी-शर्ट घातल्याचं दिसलं. ज्यावर त्यांच्या आईचा फोटो प्रिंट केलेला होता.  या पोस्टसोबत इम्तियाज अली यांनी लिहिलं, "माझी आई ७५ वर्षांची झाली आहे. तिच्यावर भरभरून प्रेम. आम्ही सगळे मिळून सध्या काश्मीरमधील पहलगाममध्ये आहोत", असं त्यांनी म्हटलं. 

इम्तियाज अली यांच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एक काश्मिरी युजरनं लिहिलं, "एक काश्मिरी म्हणून, पहलगामचं पुन्हा प्रमोशन केल्याबद्दल मनापासून आभार. ती एक हृदयद्रावक घटना होती. आम्ही कधीच अशा गोष्टीची अपेक्षा केली नव्हती".

इम्तियाज अली यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा नवीन चित्रपट २०२६ च्या बैसाखीला रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. या सिनेमात दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :इम्तियाज अलीपहलगाम दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीर