१८व्या आयफासाठी गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका न्यू यॉर्कला रवाना होत आहेत. दरम्यान, यावेळी आयफा सर्वच अर्थाने महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण या आयफामध्ये केवळ ग्लॅमरवर चर्चा होत नसून पर्यटन, व्यावसायिक संधी आणि पर्यावरण हे विषयदेखील हाताळले जात आहेत. विजक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक आंड्रे टिमिंस यांनी सांगितले की, ‘आम्ही तयार आहोत. जेव्हा एखाद्या मोठ्या चित्रपटाची निर्मिती केली जाते अन् त्या चित्रपटाचा शुक्रवार येतो तेव्हा निर्मात्यांची काय परिस्थिती असते, हे तुम्हाला माहीत आहेच. मात्र आमच्यासाठी गुरुवारीच हा शो सुरू होत असल्याने आम्ही सर्वच नर्व्हस आहोत. परंतु एक गोष्ट निश्चित न्यू यॉर्कमध्ये धूम उडणार आहे.’
वास्तविक ही कंपनी आयफाला प्रोड्यूस करीत असते. २००० साली ब्रिटन येथे आयफाची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये आयफाचे आयोजन केले जात होते. परंतु आताचे बजेट विचार करण्यापलीकडचे आहे. विभिन्न देशांमध्ये आयफाचे आयोजन केले जात असल्याने त्याच्या बजेटमध्येही प्रचंड वाढ होत आहे. न्यू यॉर्कमध्ये पहिल्यांदाच आयफाचे आयोजन केले जात असून, नेहमी जागे असणाºया या शहरात बॉलिवूडकर धूम उडवून देणार आहेत.
यावर्षी आयफाचे सूत्रसंचालन करण जोहर आणि सैफ अली खान करणार आहेत, तर सोहळ्यात सलमान खान, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंग राजपूत, दिया मिर्झा, प्रीति झिंटा, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि हृतिक रोशन आदी कलाकार स्टेजतोड परफॉर्मन्स करणार आहेत. त्याव्यतिरिक्त काही हॉलिवूड सेलिब्रिटीदेखील सोहळ्यात हजेरी लावणार असल्याचे समजते. कारण यापूर्वीच्या आयफामध्ये केविल स्पेसी, अॅँजेलिना जोली, जॉन ट्रोवोल्टा आणि हिलेरी स्वॅँक यांनी उपस्थिती लावलेली आहे.
आयफाचा मुख्य समारंभ शनिवारी मेटलाइफ स्टेडियममध्ये होणार आहे. स्टेडियममध्ये कमीत कमी ४० हजार लोक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. ३० हजार तिकिटे तर यापूर्वीच बुक करण्यात आली आहेत. दरम्यान, प्रसिद्ध टाइम्स स्कवायर येथे गुरुवारी वरुण धवन बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहे. याशिवाय रॅम्पवर देसी फॅशनचाही जलवा बघावयास मिळेल. शुक्रवारी सायंकाळी मेटलाइफ स्टेडियममध्ये संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याठिकाणी आॅस्कर विजेता ए. आर. रहमान परफॉर्मन्स करणार आहे.
तर शनिवारी मुख्य सोहळ्यात ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका आपला जलवा दाखविणार आहेत. यावेळच्या आयफाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या सोहळ्याचे थेट प्रसारण केले जाणार आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना हा सोहळा घरबसल्या अनुभवता येणार आहे.