गाणे रिलीज करण्याच्या घाईमध्ये ‘काबील’चे गुपित पडले उघडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 15:24 IST
‘काबील’मधील चार प्रमुख पात्रांपैकी एकाच मृत्यू होतो असे ‘हसीनो का दिवाना’ गाण्यातील एका दृश्यात दिसते. आता एवढी मोठी गोष्ट उघड करण्याची चूक निर्मात्यांकडून झाल्यावर सोशल मीडियावर याविषयी चांगलेच जोक्स फिरत आहेत.
गाणे रिलीज करण्याच्या घाईमध्ये ‘काबील’चे गुपित पडले उघडे
पुढील महिन्यात ‘रईस’ वि. ‘काबील’ असा सामना रंगणार आहे. शाहरुख-हृतिकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नव वर्षाच्या सुरुवातीलाच दोन बिग बजेट फिल्म्सची टक्कर होत असल्यामुळे बॉलीवूडमध्ये वातावरण चांगलेच तापलेले आहे.जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी जवळपास एकसारखीच मार्केटिंग स्ट्रॅटजी स्वीकारलेली दिसतेय. ती म्हणजे - जूने हिट बॉलीवूड गाणे रिमिक्स करून वापरायचे. ‘काबील’ने उर्वशी रौतेला स्टारर ‘हसीनो का दिवाना’ रिलीज करून आघाडी घेतल्यावर लगेच एक आठवड्यानंतर ‘रईस’ने सनी लिओनीचे ठुमके असलेले ‘लैला ओ लैला’ इंटरनेटवर लाँच केले.बॉक्स आॅफिसच्या चढाओढीमध्ये पुढे जाण्याच्या नादात ‘काबील’च्या निर्मात्यांकडून मात्र एक मोठी चूक झाली. ती चूक म्हणजे या चित्रपटातील महत्त्वाची गोष्ट अनवधानाने त्यांनी दाखवून दिली. ट्रेलरवरून ‘काबील’मध्ये चार मुख्य पात्र आहेत असे दिसते. हृतिक-यामी आणि खलनायक रोहित व रोनित रॉय. ‘हसीनो का दिवाना’ या गाण्याच्या व्हिडिओमध्ये या चार प्रमुख पात्रांपैकी रोहित रॉयचा मृत्यू होतो असे उघड झाले. गाण्याच्या एक दृश्यामध्ये रोहितच्या फोटोला हार घातल्याचे स्पष्ट दिसते. एका ट्विटर यूजरने जेव्हा ही चूक लक्षात आणून दिली तेव्हा सगळीकडेच याची चर्चा सुरू झाली. त्यावर अनेक मजेशीर जोक्स आणि ट्विटस् करण्यात आले.‘बॉलीवूड चित्रपटांत जोपर्यंत हीरो मरत नाही तो पर्यंत प्रेक्षकांना आश्चर्य होत नाही. त्यामुळे रोहित रॉयचा मृत्यू होतो किंवा नाही याच्याशी लोकांना काही देणे घेणे नाही. निर्मात्यांनाही त्याची पर्वा नाही, असे एकाने ट्विट केले. दुसरा लिहितो, हिंदी सिनेमांच्या कथेत काहीच नाविन्यता नसते. सगळ्या कथा सारख्याच असल्यामुळे न पाहतादेखील चित्रपटात काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’मध्ये हृतिक रोशन आणि यामी गौतम अंध प्रेमी जोडप्याच्या भूमिकेत आहे. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातून हृतिकला एका हीट फिल्मची अपेक्षा आहे. यावर्षी रिलीज झालेल्या ‘मोहेंजोदडो’ने बॉक्स आॅफिसवर चांगलीच माती खाल्ली. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांना साफ झिडकारून लावला.वैयक्तिक आयुष्यातही हृतिकची परिस्थिती चांगली नाही असेच म्हणावे लागेल. व्यवसायिक अपयशाबरोबरच कंगना प्रकरणामुळे त्याला खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘काबील’द्वारे नवीन वर्षाची धमाकेदार सुरूवात करण्याची तोप्रार्थना करीत आहे.