Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर म्हणते, ‘हॉरर कॉमेडीची मजाच वेगळी!’

By अबोली कुलकर्णी | Updated: March 11, 2021 18:25 IST

श्रीदेवीची लेक असलेली जान्हवी आता ११ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रूही’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

बॉलिवूडची ‘धडक’ गर्ल अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अल्पावधीतच अभिनय, सौंदर्य, ग्लॅमर यांच्या दुनियेत बाजी मारलीय. बी-टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आता जान्हवीचेही नाव घेतले जाते. श्रीदेवीची लेक असलेली जान्हवी आता ११ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रूही’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या या गप्पा... १. ‘रूही’ चित्रपटामध्ये तुझी भूमिका कशी आहे?- रूही चित्रपटात मी दुहेरी भूमिका साकारली आहे. यात मी प्रेक्षकांना एका चेटकिणीच्या भूमिकेत दिसेल. ही चेटकीण प्रेक्षकांना घाबरवेल पण आणि त्यांचे मनोरंजनही करेल. यानिमित्ताने एक वेगळे कथानक आणि भूमिका करायला मिळतेय, याचा आनंद आहे.२. राजकुमार राव आणि वरूण शर्मा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- राजकुमार आणि वरूण हे दोघेही खुप छान कॉमेडी करतात. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. सेटवर त्यांच्यासोबत माझी मैत्री झाली. सेटवर त्यांच्यामुळे एकदम धम्माल वातावरण असायचे. रूहीच्या सेटवरची ही धम्माल-मस्ती आमच्या कायम लक्षात राहील, अशीच आहे.

 ३. तू दुसऱ्यांदा हॉरर भूमिका करत आहेस. काय वाटते प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल?- होय, मी दुसऱ्यांदा  हॉरर भूमिका साकारत आहे. पण, प्रत्येक भूमिका वेगळी असते त्याप्रमाणे ही भूमिकाही माझ्या हृदयाच्या खुप जवळची आहे. नक्कीच, आम्ही चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल, असे वाटते.

४. तू इन्स्टाग्रामवर खुप अ‍ॅक्टिव्ह आहेस. जेव्हा चाहत्यांचे प्रेम मिळते तेव्हा कसे वाटते?- खूप छान वाटते. प्रेक्षकांच्या प्रेमासाठीच आम्ही दिवस-रात्र मेहनत घेत असतो. त्यांच्या कौतुकाची थाप आमच्यासाठी पॉवर बुस्टर असते. सध्या ट्रोलिंगचे प्रमाण वाढले आहे. नेटिझन्सनी आपल्या मर्यादेत प्रतिक्रिया द्याव्यात. कारण प्रत्येकाची आपली एक आवड असते.

५. इन्स्टाग्रामवर तुझे क्लासिकल डान्स व्हिडिओ बरेच दिसत आहेत. काय सांगशील?- डान्स माझा आत्मा आहे. मी डान्सशिवाय राहूच शकत नाही. रूही चित्रपटात मी पनघट या गाण्यात डान्स केला आहे. त्याचसोबत अजून एक गाणे आहे त्यातही मी बराच डान्स केला आहे. या गाण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरराजकुमार राव