Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ग्लॅमरस ‘हीरोईन’चे, नॉन ग्लॅमरस बालपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 20:32 IST

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्टारपुत्र किंवा कन्येचे पदार्पण होणे तशी नवीन गोष्ट नाही. काही कुटुंबांच्या कित्येक पीढ्या मनोरंजन विश्वात काम करत ...

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्टारपुत्र किंवा कन्येचे पदार्पण होणे तशी नवीन गोष्ट नाही. काही कुटुंबांच्या कित्येक पीढ्या मनोरंजन विश्वात काम करत आहेत. उदाहरण सांगायचे झाले तर रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ, अर्जुन कूपर, आलिया भट, श्रद्धा कपूर अशी काही नावं लगेच ओठांवर येतील. त्यामध्ये आता आणखी एक नाव जोडले जाणार आहे. ते नाव म्हणजे सैयामी खेर.आगामी ‘मिर्झियां’ चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. जेष्ठ अभिनेत्री उषा किरण यांची नात, चतुरस्र अभिनेत्री तन्वी आझमी यांची भाची, पूर्व इंडिया उत्तरा म्हात्रे आणि अभिनेता अद्वैत खेर यांची कन्या, असे सैयमीचे चंदेरी दुनियेशी नाते सांगता येईल. ‘सीएनएक्स’शी बोलताना तिने बालपण, आजी उषा किरण आणि खेळाबद्दलच्या प्रेमाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.नॉन ग्लॅमरस बालपण :सैयमीचा जन्म जरी ग्लॅमर जगतातील कुटुंबामध्ये झाला असला तरी तिचे बालपण मात्र बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर नाशिक शहरात गेले. ती सांगते, आमचे कुटुंब मुंबईहून फार पूर्वीच नाशिकला स्थलांतरित झाले होते. सिनेजगतापासून लांब माझे बालपण गेले. सायकलिंग, ट्रेकिंग, क्रिकेट खेळत मी मोठी झाले. त्यावेळी मी अभिनेत्री होईल असे वाटले नव्हते. लहानपणी घरी नेहमी जुने हिंदी गाण्यांचे स्वर कानावर पडत असत. त्यामुळे आजही माझ्या प्लेलिस्टमध्ये लतादीदी, आशाताई, रफींचे अवीट गाणे तुम्हाला दिसतील.माझी आजी ‘धमास’ :आईवडिलांनी तिला नेहमीच फिल्मी वातावरणापासून दूर ठेवले. ‘अगदी दहावीपर्यंत आम्हाला चित्रपट पाहण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे माझी आजी उषा किरण एवढी ग्रेट अभिनेत्री आहे हे मला त्याकाळी माहितच नव्हते. माझ्यासाठी तर ती केवळ ‘धमास’ आजी होती.उन्हाळ्याच्या सुट्यात तर तिच्यासोबत आम्ही खूप धमाल करायचो.सामान्य आजीप्रमाणेच ती आमचा खूप लाड करायची, सोबत खेळायची. तिनेसुद्धा कधीच आम्हाला ती खूप मोठी अभिनेत्री आहे, असे जाणवू दिले नाही. पण आता मला वाटते की, मला जर तेव्हा माहीत असते की ती कोण आहे तर मी तिच्याशी सिनेमा आणि अभिनयाविषयी खूप चर्चा केली असती. तिचे चित्रपट पाहून तिच्या अष्टपैलू, सहजसुंदर अभिनयाचे फार कौतुक वाटते’, असे ती सांगते.मी तर खेळाडू :सैयमी राज्य आणि राष्ट्रीय पातळी क्रिकेट व बॅडमिंटन खेळाडू आहे. त्यामुळे ती चित्रपटात काम करतेय याचे तिला अजुनही आश्चर्य वाटते. ती म्हणते, मुळात मला स्पोर्टस्मध्ये खूप रुची आहे. खेळांना आपल्याकडे विशेष महत्त्व दिले जात नाही. भविष्यात क्रीडा शिक्षणासंबंधी काम करण्याची माझी इच्छा आहे. इतकेच कशाला, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मला ‘क्रीडाप्रधान’ चित्रपटांत काम करायला आवडेल. खेळांमुळेच माझ्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय प्राप्तीसाठी चिकाटीने मेहनत घेण्याची वृत्ती विकसित झाली. या गुणांचा मला अभिनय करतानादेखील खूप मदत होते.