Join us

'त्या' कार्यक्रमामुळे कार्तिक आर्यन अडचणीत? पाकिस्तानी कनेक्शनमुळे निर्माण झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:04 IST

अभिनेता कार्तिक आर्यन एका वादात अडकला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन एका वादात अडकला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने त्याला एक पत्र पाठवून १५ ऑगस्ट २०२५ रोजी अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 'आगा रेस्टॉरंट अँड केटरिंग' करत आहे, ज्याचे मालक पाकिस्तानी वंशाचे श्री शौकत मरेदिया असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. हेच रेस्टॉरंट पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या जश्न-ए-आझादी कार्यक्रमाचाही प्रचार करत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी गायक आतिफ असलम सहभागी होणार आहे.

FWICE ने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "या कार्यक्रमाशी तुमचा संबंध जरी अनावधानाने झाला असेल तरी तो राष्ट्रीय भावना दुखावतो. हे चित्रपट उद्योगाने याआधीच ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे". त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, "अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारतीय कलाकारांचा सहभाग अभिमानास्पद असतो. मात्र, या विशिष्ट कार्यक्रमामुळे राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो".

चित्रपटसृष्टीतील संघटनांनी २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर अनौपचारिक बंदी घातली होती. FWICE आणि ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) यांनी वेळोवेळी कलाकारांना या निर्णयाचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. या वादानंतर आता कार्तिक आर्यनच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, "कार्तिक आर्यन या कार्यक्रमाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. त्याने या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत कधीही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही". पुढे त्यांनी असंही स्पष्ट केलं की, "आम्ही आयोजकांशी संपर्क साधून त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की त्यांनी कार्तिकचा फोटो आणि नाव जेथे जेथे वापरलं आहे ते तात्काळ हटवावं".

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूड