Join us

‘रूदाली’ फेम दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 09:54 IST

‘रूदाली’ सारख्या आयकॉनिक चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज रविवारी (23 सप्टेंबर 2018) निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या आणि किडनीच्या कॅन्सरने पीडित होत्या. 

‘रूदाली’ सारख्या आयकॉनिक चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज रविवारी (23 सप्टेंबर 2018) निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या आणि किडनीच्या कॅन्सरने पीडित होत्या. कल्पना लाजमी यांनी आज पहाटे 4.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. कल्पना लाजमींना गत तीन वर्षांपासून किडनीच्या कॅन्सरने ग्रासले होते. गेल्या तीन महिन्यात त्यांचा हा आजार आणखीच बळावला होता. किडनीसोबतचं लिव्हरच्या विकारानेही त्यांना वेढले होते. 

कल्पना लाजमी यांच्या उपचारासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली होती. गत नोव्हेंबरमध्ये त्यांना कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले असता सलमान खान,आमिर खान, रोहित शेट्टी आणि इंडियन फिल्म्स अ‍ॅण्ड टेलिव्हीजन डायरेक्टर्स असोसिएशनने त्यांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांच्या त्या कन्या होत्या. तर, चित्रपट निर्माते गुरुदत्त त्यांचे मामा होते. सुप्रसिद्ध गायक भूपेन हजारिका हे कल्पना यांचे जवळचे मित्र (पार्टनर) होते. कल्पना यांनी हजारिका यांच्या आयुष्यावर 'भूपेन हजारिका: अॅज आय न्यू हिम' नावाचे पुस्तकही लिहिले होते. कल्पना यांनी सहाय्यक दिग्दर्शनातून  कलाविश्वात पदार्पण केले. श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कल्पना यांनी ‘एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'दमन' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याशिवाय लोहित किनारे ही टीव्ही मालिकाही दिग्दर्शित केली. रूदालीसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २००१ मध्ये आलेल्या कल्पना यांच्या दमन या चित्रपटासाठी अभिनेत्री रवीना टंडनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. २००६ मध्ये आलेला चिंगारी हा कल्पना यांचा अखेरचा सिनेमा ठरला.