Join us

सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:36 IST

गोरेगाव येथे हा स्टुडिओ आहे जिथे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं आणि हिंदी मालिकांचंही शूट झालं आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या फिल्म स्टुडिओपैकी एक फिल्मीस्तान स्टुडिओची (Filmistan Studio)  अखेर विक्री झाली आहे. गोरेगाव येथे हा स्टुडिओ आहे जिथे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं आणि हिंदी मालिकांचंही शूट झालं आहे. काजोल आणि राणी मुखर्जीचे आजोबा शशधर मुखर्जी यांनी १९४३ साली फिल्मीस्तान स्टुडिओची स्थापना केली. ८२ वर्षांनंतर हा स्टुडिओ रियल इस्टेट कंपनी आर्केड डेव्हलपर्सला १८३ कोटींना विकला आहे. या ठिकाणी ३००० कोटींचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवण्याची योजना आहे. यामुळे संपूर्ण सिनेइंडस्ट्री भावुक झाली आहे. 

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या स्टुडिओमुळे इंडस्ट्रीतील हजारो मजुरांचं घर चालतं. स्टुडिओ विकला गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फिल्मीस्तान आधी मुंबईतील तीन मोठ्या स्टुडिओ विकले गेले आहेत. यामध्ये हिंदी सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांचा आरके स्टुडिओचाही समावेश आहे. तसंच कमाल अमरोही यांचा कमालिस्तान स्टुडिओही विकला गेला आहे. 

हिंदुस्तान टाइम्सनुसार, आर्केड डेव्हलपर्स लिमिटेड फिल्मीस्तान स्टुडिओ जमीनदोस्त करुन याठिकाणी लक्झरी रेसिडेन्शियल अपार्टमेंट प्रोजेक्ट लाँच करणार आहे. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबर मध्ये या प्रोजेक्टची सुरुवात होणार आहे. हे ५० मजली आणि ३, ४ आणि ५ बीएचके अपार्टमेंट असणार आहे. यामध्ये पेंटहाऊसचाही समावेश आहे.

कोणत्या सिनेमांचं झालं शूट?

या स्टुडिओमध्ये 'तुमसा नही देखा' आणि 'जागृती' या सिनेमांचं शूटिंग झालं होतं. यांना सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.  पाच एकर वरील या फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये सात शूटिंग फ्लोर आहेत . तसंच आऊटडोअर लोकेशनसाठी गार्डनही आहे. हैदराबादच्या निजामाने या स्टुडिओसाठी फंडिंग केली होती. 'शहीद', 'शबनम', 'सरगम', 'अनारकली','नागिन','मुनीमजी','पेइंग गेस्ट' या सिनेमांचंही शूट झालं आहे. आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या '२ स्टेट्स'सिनेमातील 'ओफ्फो' गाण्याचंही शूट इथे झालं होतं. 

टॅग्स :बॉलिवूडमुंबई