Join us

पंधरा वर्षांनंतर रितेश देशमुखने पत्नी जेनेलियाबद्दल केला ‘हा’ खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 15:37 IST

रितेश-जेनेलियाच्या ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटाला आज पंधरा वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करताना रितेशने दोन पोस्ट शेअर केल्या असून, त्यामध्ये पत्नी जेनेलियाबद्दल त्याने एक खुलासा केला आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने गेल्या १५ वर्षांपूर्वी ‘तुझे मेरी कसम’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. २००३ मध्ये आलेल्या या चित्रपटातून बॉलिवूडला रितेश-जेनेलिया डिसूझा ही सुपरहिट जोडी मिळाली. दोघांचा डेब्यू असलेल्या या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. पुढे नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केले. रितेश-जेनेलियाच्या या चित्रपटाला आज पंधरा वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाशी संबंधित काही खास आठवणी शेअर करताना रितेशने सांगितले की, शूटिंग सुरू झाल्याच्या दोन दिवसानंतरही जेनेलिया माझ्याशी बोलली नव्हती, असा खुलासा केला आहे.  रितेशने या चित्रपटासंबंधी दोन फोटो शेअर करताना लिहिले की, ३ जानेवारी २००३, आजपासून बरोबर १५ वर्षांपूर्वी माझा डेब्यू चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने माझे आयुष्य बदलले. मी आर्किटेक्ट होतो, मात्र या चित्रपटानंतर अभिनेता बनलो. को-स्टार जेनेलिया माझी बायको झाली. रितेश आपल्या पत्नी जेनेलियाला प्रेमाने ‘बायको’ असे संबोधतो.  पुढच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, शूटिंग सुरू होऊन दोन दिवस झाले होते, तरी जेनेलिया माझ्याशी बोलली नव्हती. कारण माझे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. दरम्यान, रितेश-जेनेलियाची गणती बी-टाउनमधील सर्वात क्यूट कपलमध्ये केली जाते. या दोघांनी ‘मस्ती’, ‘तेरे नाम लव हो गया’ या चित्रपटांमध्येही एकत्र काम केले आहे. या दाम्पत्याला दोन मुले असून, मोठ्याचे नाव रियान तर लहान मुलाचे नाव रायल असे आहे.