बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवन याची फॅन फॉलोइंग ‘जुडवा-२’ नंतर चांगलीच वाढली आहे. काही दिवसांपूर्वीचा एक किस्सा आहे. त्याच्या एका महिला चाहतीने वरुणला भेटण्यासाठी सर्व परिसीमा ओलांडल्या. होय, त्याचे झाले असे की, ही महिला चाहती वरुणला दररोज मेसेज करीत होती. तिला वरुणला भेटायचे होते. त्यासाठी ती सातत्याने वरुणला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवित होती. मेसेजमध्ये ती वरुणला भेटण्यासाठी तगादा लावत होती.
मात्र वरुणने तिच्या सर्व मेसेजकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या चाहतीने वरुणला धमकी देताना म्हटले की, ‘जर तू मला भेटला नाहीस तर मी आत्महत्या करेल.’ तिचा हा मेसेज वाचून वरुणला काही काळ धक्काच बसला. त्याने या मेसेजकडे दुर्लक्ष न करता थेट पोलीस ठाणे गाठले. त्यासाठी त्याने कायदेशीर सल्ला घेऊन मुंबईतील सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली.
मिड डेच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितले की, ‘आम्हाला वरुण धवनकडून तक्रार प्राप्त झाली आहे. कोणीतरी महिला चाहती त्याला मेसेजेस करून त्रास देत होती. आम्ही तिचा शोध घेत आहोत. अजून तपास सुरू असून, लवकरच तिला ताब्यात घेतले जाणार आहे. सध्या त्या महिलेने मोबाइल नंबर स्विच आॅफ करून ठेवल्याने तपासात काहीसे अडथळे येत आहेत.’ दरम्यान, आपल्या चाहत्यांकडून त्रास सहन करणारा वरुण हा पहिलाच कलाकार नसून, यापूर्वीदेखील अनेकांना अशा त्रासाचा सामना करावा लागला आहे.
महिला फॅनने दिली धमकी; वरुण धवनने गाठले पोलीस ठाणे, वाचा काय आहे प्रकरण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 09:39 IST