Esha Deol: बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रीमधील वाद हे काही नवीन नाहीत. अभिनेत्रींमध्ये काम मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा असते. यातूनच अभिनेत्रींमध्ये एकमेकींबद्दल प्रचंड ईर्षा, द्वेष आणि कधी कधी संघर्षसुद्धा पाहायला मिळतो. पेज-थ्री दुनियेच्या शब्दांत सांगायचं झालं तर अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते. रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींमधली कॅटफाईट तर जगजाहीर आहे. मग ती दीपिका-कतरिना असो किंवा मग करीना कपूर-बिपाशा बसू असो. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मीडियामध्ये त्यांच्या भांडणामुळे प्रसिद्धी मिळवली आहे. आधी टोमणे आणि नंतर थेट मारामारीपर्यंत दोन अभिनेत्रींमधील भांडण पोहचलं होतं. त्या दोन अभिनेत्री म्हणजे अमृता राव (Amrita Rao) आणि ईशा देओल (Esha Deol). सेटवर सर्वांसमोर ईशाने अमृताच्या कानफटात ठेवून दिली होती. आता या प्रकरणावर इतक्या वर्षांनी ईशा देओलनं भाष्य केलं आहे.
"टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ईशानं या प्रकरणावर मौन (Esha Deol Reveals Why She Slapped Amrita Rao) सोडलं. ती म्हणाली, "होय, मी तिच्या कानाखाली दिली होती. कारण तिने तिची मर्यादा ओलांडली होती. तेव्हा तो माझ्या आत्मसन्मानाचा मुद्दा होता आणि मला त्या गोष्टीचा जराही पश्चात्ताप नाही. कारण त्यावेळी तेच योग्य होतं. एका अस्वीकार्य परिस्थितीत भावनेच्या भरात दिलेली ती प्रतिक्रिया होती, जे मी सहसा करत नाही. पण, टीमसमोर स्वत:साठी खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं होतं", असं ईशाने म्हटलं.
पुढे ती म्हणाली, "अमृताला नंतर तिची चूक समजली आणि तिने माझी माफी मागितली. मीसुद्धा तिला माफ केलं. आता आमच्या नात्यात काही कटुता नाही. पण त्या घटनेनंतर मी अमृतासोबत काम केलं नाही. भविष्यात कधी संधी मिळाली तर मी नक्कीच तिच्यासोबत काम करेन. इतक्या वर्षांनी मी याबद्दल बोलतेय कारण, त्या घटनेविषयी बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. मला प्रवृत्त केल्याशिवाय असं वागणं माझा स्वभावच नाही. त्याआधी मी लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बिपाशा बासू यांच्यासोबत कोणत्याही समस्येशिवाय काम केलं होतं".
इशा देओल आणि अमृता राव या दोघी २००६ मध्ये रिलीज झालेल्या 'प्यारे मोहन' चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटात फरदीन खान आणि विवेक ओबेरॉय हे देखील होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ईशाने अमृताला कानाखाली मारली होती. या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ईशा अजूनही अभिनय जगात सक्रिय आहे. पण अमृता राव गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.