तब्बल २० वर्षांनंतर अभिनेता इमरान हाश्मी, दिग्दर्शक आदित्य दत्त आणि संगीतकार हिमेश रेशमिया पुन्हा एकत्र येत आहेत. त्यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे ‘गनमास्टर G9’. हा सिनेमा एक फॅमिली अॅक्शन ड्रामा असणार आहे. ‘आशिक बनाया आपने’नंतर इमरान, हिमेश आणि आदित्य या तिघांचं हे तिघे पहिल्यांदा एकत्र येत आहेत. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. "धंदे से दूधवाला हू, बंदा बारुदवाला हू", अशा दमदार संवादांनी ‘गनमास्टर G9’ सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिनेमात इमरानची जोडी जिनिलिया देशमुखसोबत झळकणार आहे.
‘गनमास्टर G9’ची घोषणा
हा सिनेमा निर्माते दीपक मुकुट आणि हुनर मुकुट यांच्या सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट बॅनरअंतर्गत तयार होणार असून, यात इमरान हाश्मीसोबत जिनिलिया डिसोझा-देशमुख, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक सिंग हे कलाकारही दिसणार आहेत. ‘गनमास्टर G9’ मध्ये इमरान हाश्मी एका पूर्णपणे वेगळ्या अॅक्शन अवतारात दिसणार असून, सिनेमात स्टायलिश दृश्यं आणि भावनिक कथानक यांचा समतोल असणार आहे. प्रेक्षकांसाठी हा एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे, असं निर्माते आणि दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.
कधी रिलीज होणार ‘गनमास्टर G9’?
दिग्दर्शक आदित्य दत्त यांनी सांगितलं, "‘आशिक बनाया आपने’ करताना आम्ही सगळेच तरुण आणि प्रयोगशील होतो. ‘गनमास्टर G9’सह आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. यावेळी अधिक परिपक्व आणि स्पष्ट दृष्टिकोनासह आम्ही सिनेमा करत आहोत. माझ्यासाठी ही गोष्ट एक वर्तुळ पूर्ण होण्यासारखं आहे."
निर्माता दीपक मुकुट म्हणाले, "हा सिनेमा भावनिक, आकर्षक आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना जोडणारा आहे. आमचं बॅनर नेहमीच दमदार दृष्टिकोन असलेल्या दिग्दर्शकांना पाठिंबा घेतं. इमरान, जिनिलिया आणि अपारशक्तीसारखी स्वप्नवत स्टारकास्ट आम्हाला मिळालीय, हे आमचं भाग्य."
हिमेश रेशमिया पुन्हा एकदा संगीतकार म्हणून या सिनेमात दिसणार असून, या सिनेमाचं संगीतदेखील तितकंच गाजण्याची शक्यता आहे. ‘गनमास्टर G9’चं चित्रीकरण पावसाळ्यानंतर मुंबईत सुरू होणार आहे. त्यानंतर उत्तराखंडमध्येही सिनेमाचं शूटिंग होणार आहे. हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, त्याची घोषणा होताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.