या कारणामुळे गुलजार आणि राखी यांच्यात आला होता दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 16:43 IST
गुलजार आणि राखी यांनी 15 मे 1973ला लग्न केले. पण लग्नाच्या काहीच महिन्यात त्यांच्यात भांडणे व्हायला लागली. मेघना या ...
या कारणामुळे गुलजार आणि राखी यांच्यात आला होता दुरावा
गुलजार आणि राखी यांनी 15 मे 1973ला लग्न केले. पण लग्नाच्या काहीच महिन्यात त्यांच्यात भांडणे व्हायला लागली. मेघना या त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर तर काहीच महिन्यात ते दोघे वेगळे झाले.राखी ही सत्तरीच्या दशकात आघाडीची अभिनेत्री होती. तिचे लग्न अजय बिस्वास या निर्मात्यासोबत झाले होते. अजय यांच्यामुळेच ती अभिनयक्षेत्रात आली. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर गुलजार तिच्या आयुष्यात आले आणि त्यांच्यासोबत तिने लग्न केले. पण राखीने चित्रपटात काम करू नये असे गुलजार यांचे म्हणणे होते. त्यामुळे गुलजार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर राखीने चित्रपटांत काम करणे बंद केले. राखीला लग्नानंतरही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण चित्रपटात काम करण्याचा विषय काढताच गुलजार तिच्यावर चिडत असत आणि त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहाण्याचेच ठरवले. या कारणामुळे सतत त्यांच्यात खटके उडत असत. आंधी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी तर त्यांच्यात खूप मोठी भांडणे झाली असे म्हटले जाते.आंधी या चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीरमध्ये सुरू होते. या चित्रपटात संजीव कुमार आणि सुचित्रा सेन प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर एका रात्री सगळे कलाकार मजा-मस्ती करत होते. त्यावेळी संजीव कुमार यांनी खूप दारू प्यायली होती. सुचित्रा खूप कंटाळल्याने तिला रूममध्ये आराम करायला जायचे होते. पण काहीही झाले तरी संजीव कुमार तिला जायला देत नव्हते. सुचित्रा त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी गुलजार यांनी मध्यस्थी करून कसे तरी सुचित्राला तिच्या खोलीपर्यंत सोडले. सुचित्रा खूप चिडली असल्याने तिचा राग शांत होईपर्यंत गुलजार तिथेच थांबले होते. पण गुलजार खोलीवर परतल्यावर सुचित्राला ते तिच्या रुममध्ये सोडायला का गेले असा प्रश्न राखीला पडला होता. पण गुलजार यांनी याचे उत्तर देणे टाळले. पण तरीही राखी ऐकायला तयारच नव्हती. त्यावेळी त्या दोघांमध्ये खूप भांडणे झाली आणि राखीला गुलजार यांनी दारुच्या नशेत मारले असे म्हटले जाते. राखी आणि गुलजार यांच्या नात्यात त्या दिवसानंतर प्रचंड दुरावा निर्माण झाला आणि राखीने पुन्हा चित्रपटात काम करण्याचे ठरवले. त्याच दरम्यान यश चोप्रा कभी कभी या चित्रपटाच्या लोकेशनची पाहणी करण्यासाठी काश्मीरला आले होते. या चित्रपटात राखीने काम करावे अशी त्यांची इच्छा होती. राखीने लगेचच त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि ती पुन्हा चित्रपटांकडे वळली.