Join us  

मानलेल्या बहिणीला आठवून भावूक झालेत धर्मेन्द्र, संघर्षाच्या काळात दिला होता आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 9:59 AM

आज त्यांची ही बहीण या जगात नाही. तिच्या आठवणीने धर्मेन्द्र भावूक झालेत.

ठळक मुद्दे आज धर्मेन्द्र कोट्यवधीच्या बंगल्यात राहतात. पण एकेकाळी त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते. होते ते केवळ हिरो बनण्याचे एक स्वप्न.

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला हा सण देशभर साजरा होता. बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या एका बहिणीची आठवण झाली. धर्मेन्द्र यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक महिला धर्मेन्द्र यांना राखी बांधताना दिसत आहे. आज त्यांची ही बहीण या जगात नाही. तिच्या आठवणीने धर्मेन्द्र भावूक झालेत.

‘माझ्या गावच्या या देवीने माझ्या संघर्षाच्या काळात माझी मदत केली. स्वत:च्या रेल्वे क्वॉर्टरच्या बाल्कनीत मला राहण्यासाठी जागा दिली. ती दरवर्षी मला राखी बांधायची. आज ती या जगात नाही. राखीच्या दिवशी हमखास आठवते,’ असे भावूक झालेल्या धर्मेन्द्र यांनी लिहिले. काही तासांत हजारो लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

धर्मेन्द्र यांच्या या पोस्टनुसार, त्यांच्या या बहिणीचे नाव लक्ष्मी आहे. ती धर्मेन्द्र यांची मानलेली बहीण. मुंबईच्या माटुंग्यातील रेल्वे क्वार्टरमध्ये ती राहायची. धर्मेन्द्र हिरो बनण्यासाठी मुंबईला आले तेव्हा, त्यांच्या याच बहिणीने त्यांना आधार दिला.  आज धर्मेन्द्र कोट्यवधीच्या बंगल्यात राहतात. पण एकेकाळी त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते. होते ते केवळ हिरो बनण्याचे एक स्वप्न.

अनेक दिवस वर्सोवा येथे एका गॅरेजमध्ये त्यांनी काम केले. जावेद अख्तर यांच्या एका शोमध्ये धर्मेन्द्र यांनी संघर्षाच्या काळातील काही आठवणी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, ‘ त्यादिवशी एका गाण्याचे रेकॉर्डिंग होते. प्रोड्यूसर मला काही पैसे देतील आणि मी जेवण करेल, याच आशेने मी तिथे पोहोचलो होतो. पण निर्माते आले नाहीत आणि पैसेही मिळाले नाहीत. मला चालत घरी परतावे लागले.’ 

टॅग्स :धमेंद्र