Join us  

जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 9:58 AM

हनुमान जयंतीच्या निमित्ताने 'आदिपुरुष' च्या मेकर्सने सिनेप्रेमींना ही भेट दिली आहे.

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाची घोषणा केली. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून वेगेवगळ्या कारणांमुळे सिनेमाची चर्चा होत असते. सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त गजानन नागे (Devdatta Nage) हनुमानाची भूमिका साकारत आहे. आज हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर देवदत्तचा लुक शेअर करण्यात आला आहे. हनुमानाच्या गेटअपमध्ये देवदत्त अगदी शोभून दिसतोय.

दोन्ही दंडांवर, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, बलवान शरीरयष्टी, जानवं, कपाळावर गंध अशा लुकमध्ये देवदत्त ध्यानधारणा करताना दिसत आहे. तर मागे प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील  अभिनेता प्रभासचा फोटो दिसत आहे. प्रभू श्रीरामाप्रती हनुमानाची असलेली निष्ठाच पोस्टरमधून दिसून येते.

'आदिपुरुष'च्या मेकर्सने हनुमान जयंतीच्या निमित्ताने सिनेप्रेमींना ही भेट दिली आहे. सिनेमात अभिनेता प्रभास (Prabhas) प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनन (Kriti sanon) सीतेच्या भूमिकेत आहे तर सनी सिंग (Sunny Singh) लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. सिनेमाची घोषणा झाली तेव्हा या सर्व कलाकारांच्या लुकची चर्चा झाली. त्यात हनुमानाच्या भूमिकेतील अभिनेता देवदत्त नागेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. अभिनेता प्रभासने देवदत्त नागेचे हे पोस्टर शेअर करत लिहिले, 'राम के भक्त और रामकथा के प्राण...जय पवनपुत्र हनुमान!'

'आदिपुरुष'सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. सिनेमात सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र सैफचा लुक प्रेक्षकांना अजिबातच पटला नाही. तसंच सिनेमातील व्हीएफएक्स सुद्धा नेटकऱ्यांना फारसे रुचले नाहीत. त्यामुळे सिनेमाला ट्रोलच जास्त करण्यात आलं. ट्रोलिंग पाहता ओम राऊत यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली. आज देवदत्त नागेचा लुक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलाय असंच दिसतंय. 

'आदिपुरुष' येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बिग बजेट चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :देवदत्त नागेआदिपुरूषहनुमान जयंतीप्रभासक्रिती सनॉनसैफ अली खान