Join us  

प्रियंका चोप्रा-निकच्या आधीच बोहल्यावर चढणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 8:10 PM

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडची सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बोहल्यावर चढणार आहेत.

ठळक मुद्दे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 13 नोव्हेंबरला अडकणार विवाहबंधनात

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नसोहळ्याची धूम लवकरच सुरु होणार आहे. बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडची सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बोहल्यावर चढणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या तारखेवरुन सुरु झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळतो आहे. हे दोघे 13 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

डीएनएच्या रिपोर्टनुसार, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा सोहळा 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. 13 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर सात फेरे घेणार असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्याही लग्नाची तारीख 20 नोव्हेंबर होती पण आता ही तारीख आणखी लवकर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचे डेस्टिनेशन वेडींग स्विर्झंलँड किंवा इटली येथे होणार आहे. इटलीतील लेक कोमो येथे दीपिका –रणवीरचा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लग्नात दोघांच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असून हा फारच खासगी सोहळा असेल. तसेच त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दोन ठिकाणी होईल. बॉलिवूड आणि इतर काही मित्रपरिवारासाठी मुंबईत तर बंगळूर येथे दीपिकाच्या कुटुंबियासाठी असेल.

दीपिका आणि रणवीर लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेली आहे. या लग्नाला जवळच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना याविषयी कळवण्यात आलेले आहे. त्यांच्या लग्नाला केवळ ३० लोकच हजेरी लावणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला कोणाकोणाला निमंत्रणं देण्यात आली हे अद्याप कळले नसले तरी बॉलिवूडमधील त्यांच्या जवळचे काही मित्र-मैत्रीण देखील लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग